अहमदनगर : शहर व परिसरातील रस्त्यांवर ठाण मांडणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर महापालिकेच्या भरारी पथकाने कारवाई केली असून, आतापर्यंत शंभरहून अधिक विक्रेत्यांना दंड करण्यात आला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचाच भाग म्हणून शहरातील भाजी बाजार बंद करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केला आहे. असे असले तरी शहरातील विविध ठिकाणी भाजी विक्रेते पथारी टाकून बसत आहेत. नियमांचे पालन करता भाजी विक्रेते सकाळी व सायंकाळी अशा दोन वेळेत बसतात. शहरातील महात्मा फुले चौक, चितळे रोड, बालिकाश्रम रोड, भुतकरवाडी चौक, एकविरा चौक, पाईपलाईन रोड आदी भागांत भाजी विक्रेते बसतात. भाजी घेण्यासाठी ग्राहकांचीही गर्दी होत असून, यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेने गर्दी रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना केली असून, हे पथक सकाळी व सायंकाळी शहरभर फिरत आहे. या पथकाकडून शंभरहून अधिक विक्रेत्यांवर कारवाई केली गेली.
प्रशासनाने घरोघरी जाऊन भाजी विक्री करण्यास परवानगी दिलेली आहे. ग्रामीण भागातून विक्रेते वाहनांतून भाजी आणून घरोघरी विकत आहेत. घरोघरी भाजी विक्री करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे नागिरकांना भाजी मिळणे कठीण झाले आहे. भाजी खरेदीसाठी ग्राहक रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावरही पथकाकडून कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले.
......
पिशवी घेऊन नागरिक रस्त्यावर
शहरात सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. रिकाम्या पिशव्या घेऊन नागरिक रस्त्यावर फिरतात. अधिकाऱ्यांनी विचारल्यास किराणा घ्यायला चाललो आहे, असे कारण पुढे केले जाते. त्यामुळे अधिकाऱ्यांचाही नाईलाज होतो.