अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या सन्मान सोहळ्यात संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ व वनिता गुंजाळ यांना कोरोना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले. अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित अरणगाव येथील मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून बेवारस मनोरुग्णांचे पुनर्वसनाचे कार्य सुरू आहे. या मानवसेवा प्रकल्पात कार्य करणारे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवकांनी कोरोनाच्या संकटकाळात जीवावर उदार होऊन रस्त्यावरील निराधार, पीडित मनोरुग्ण माता-भगिनी व बंधूंना आधार देऊन त्यांच्यावर उपचार केले. समुपदेशन करून त्यांचे कुटुंबात पुनर्वसन करण्याचे कार्य केल्याबद्दल संस्थेस कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले.
माणुसकीच्या भावनेने सुरू असलेले मानवसेवेचे कार्य प्रेरणादायी असून, अशा सामाजिक संस्थांमुळे समाज सावरला असल्याचे पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी सांगितले. मानवसेवेच्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी अहमदनगरचे अपर पोलीस अधीक्षक सौरभ आग्रवाल, विभागीय पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, भरोसा सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख, पोलीस मित्र संघटनेचे राज्य संघटक सुनील दरंदले, अमित इथाटे, शारदा होशिंग, सतीश गिते आदी उपस्थित होते.