जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत आणि तालुक्यांतर्गत बदल्याची प्रक्रिया दरवर्षी मे महिन्यात होते. यंदा कोरोना संसर्गाचा कहर असल्याने कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी आवश्यक असणारी माहिती तयार करून ठेवली असून, शासनाने आदेश दिल्यास बदल्या करण्यात येणार आहेत.
दरवर्षी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया १५ मेपर्यंत राबवते. जिल्ह्यांतर्गत आणि तालुक्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी ग्रामविकास विभाग शासन आदेश काढून बदल्यांचा रेशो निश्चित करून देतात. साधारणपणे दरवर्षी एकूण कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार १० टक्के प्रशासकीय आणि ५ टक्के विनंती बदल्या होतात. यासाठी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करून ती प्रसिद्ध करत असते. यंदाही ती करण्यात आली आहे. बदल्यांबाबत शासनाचा आदेश आला तर बदल्या होतील; अन्यथा आहे ती स्थिती राहील, अशी शक्यता आहे.
दरम्यान, कोरोना संसर्गामुळे बदल्या करण्यात येऊ नयेत, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. आधीच वाढत्या कोरोना संकटामुळे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब अडचणीत आहे. शासनाने या महामारीत १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलावलेले आहे. यामुळे यंदा कर्मचाऱ्यांना बदलीत सूट द्यावी आणि ते शक्य नसल्यास प्रशासकीय बदल्या रद्द करून केवळ विनंती बदली करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.