केडगाव : गेली पाच महिने धुमाकूळ घातलेल्या कोरोनाने आता नगर तालुक्यातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील ११० गावांपैकी ६४ गावे सध्या कोरोनामुक्त झाली आहेत. ४६ गावांमध्ये एकूण ११६ सक्रिय रुग्ण आहेत. तरीही गणेश विसर्जन व इतर सणासुदीत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
एप्रिल ते मे महिन्यांत तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या प्रति महिना तीनशेच्या पुढे होती. जुलै महिन्यात तालुक्यात २०२ सक्रिय रुग्ण होते. ऑगस्टमध्ये १६०, तर सध्या ११६ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिसून येते. आजपर्यंत एकूण बाधित रुग्ण १७ हजार १२९ आढळून आले आहेत. ५६० जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्याची लोकसंख्या १ लाख ३९ हजार ९४४ एवढी आहे. सध्या ४६ गावांमध्ये सक्रिय रुग्ण असले तरी रुग्ण संख्या अत्यल्प आहे. १८ गावांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या एक आहे. आठ गावांनी सक्रिय रुग्णांची संख्या दोन आहे, तर उर्वरित २० गावांतील सक्रिय रुग्णांची संख्याही दहाच्या आतच असल्याने नगर तालुक्याला कोरोनातून मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
----
बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के
तालुक्यात एकूण १७ हजार १२९ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ५६० जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर ३.३३ टक्के, तर बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के आहे. सर्वाधिक मृत्यू चास आरोग्य केंद्रांतर्गत ९८ झाले आहेत, तर सर्वांत कमी मृत्यू टाकळी काझी आरोग्य केंद्राअंतर्गत ३५ झालेले आहेत.
---
प्रशासनाच्या प्रयत्नांना यश
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तालुक्यात तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी संजय केदारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच परिणाम तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे.