अहमदनगर : महापालिकेच्या हद्दीमधून एमआयआरसीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवहिनीचे काम सुरू आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदाराने महापालिकेने केलेले सिमेंटचे रस्ते उखडले आहेत. तसेच नागापूर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचेही नुकसान केले आहे. त्यामुळे सदर ठेकेदारानेच ही दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांनी एमआयडीसीचे अभियंता गणेश वाघ यांच्याकडे केली आहे.
एमआयआरसीच्या जलवाहिनीचे काम करताना सदर ठेकेदाराकडून जेसीबी यंत्राच्या साहाय्याने महापालिकेने केलेले रस्ते उखडले जात आहेत. जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची परिसरात टंचाई निर्माण झाली आहे. ड्रेनेजलाइन तुटल्याने मैलामिश्रित पाणी रस्त्यावर पसरले आहे. मगापालिकेच्या हद्दीतील पाइपलाइन दुरुस्तीच्या कामाचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी एमआयडीसीचे उपअभियंता गणेश वाघ यांच्याकडे सप्रे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळ्यापूर्वी एमआयडीसी परिसरातील एल व एम ब्लॉकमधील पावसाळी पाण्याची विल्हेवाट लावावी. हे पाणी शेट सिना नदीपर्यंत सोडण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून बोल्हेगाव फाटा, गणेश चौक, काकासाहेब म्हस्के परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरणार नाही.
एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील एल व एम ब्लॉकमधील दूषित व पावसाचे पाणी हे बोल्हेगावमधील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बेकायदेशीरपणे सोडल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एमआयडीसी कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेत नाही. केमिकलमुळे शेतातील पिके नष्ट होत आहेत, असेही सप्रे यांनी निवेदनात म्हटले आहे. प्रश्न न सोडविल्यास उपोषण करण्याचा इशारा नगरसेविका कमल सप्रे, अशोक बडे, मदन आढाव, रीता बाकरे यांनी दिला. यावेळी भालचंद्र भाकरे, सतीश नेहूल, विक्रम सप्रे उपस्थित होते.
--
फोटो-०७ दत्ता सप्रे
नागापूर परिसरातील जलवाहिनी, रस्ते दुरुस्तीची मागणी माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांनी एमआयडीसीचे उपअभियंता गणेश वाघ यांच्याकडे केली.