अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जनतेला खोटे आश्वासन देत काँग्रेसच्या विरोधात अप-प्रचार केला. भाजपा सत्तेत आल्यास जीवनावश्यक वस्तुंचे भाव कमी करू, असे आश्वासन दिले. मात्र, महिनाभरात पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि दैनंदिन वस्तुंची मोठ्या प्रमाणात भाव वाढ झालेली आहे. याचा निषेध करण्यासाठी रविवारी काँग्रेसने नगरमध्ये आंदोलन केले.शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या कापड बाजारात भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौकापर्यंत वाहने बंद करून लोटत नेऊन ‘दे धक्का’ आंदोलन केले. देशापातळीवर निर्माण झालेल्या भाववाढी विरोधात आणि सर्वसामान्य जनतेची हाक केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. यासाठी ३० जून ते ६ जुलै दरम्यान जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ब्लॉक पातळीवर निषेध आंदोलन करण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेस समितीच्यावतीने देण्यात आल्या होत्या.त्यानुसार रविवारी ११ च्या सुमारास नगरमध्ये आंदोलन झाले. यात कार्यकर्त्यांनी मोटारसायकल बंद करून सुमारे एक किलोमीटर लोटत नेल्या आणि सरकारच्या पेट्रोल, डिझेल दर वाढीचा निषेध नोंदविला. आंदोलनात शहरजिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, उबेद शेख, बाळासाहेब भुजबळ, संध्या मेढे, आर.आर. पिल्ले, नीलिमा गायकवाड, अभिजित कांबळे, धनपाल राठोड यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले. (प्रतिनिधी)
भाववाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
By admin | Updated: July 7, 2014 00:36 IST