अहमदनगर : ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने नगरमध्ये ऑक्सिजनचे बेड असलेले जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या देण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनच्या बेडची गरज भासते आहे; परंतु ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगरमध्ये ऑक्सिजनचे बेड असलेले जम्बो कोविड केअर सेंटर उभरण्याची मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केली होती. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सूचनेनुसार बुधवारी काँग्रेसचे पदाधिकारी, मनपाचे अधिकारी आणि पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांनी जम्बो कोविड केअर सेंटरचा प्रस्ताव सभागृहाला सादर करणार असल्याचे अश्वासन दिले होते; परंतु महापालिकेचे असे कोणतेही नियोजन नसल्याचे आयुक्त शंकर गोरे यांनी फोनवरून सांगितले असून, आयुक्तांनी घुमजाव केल्याचा आरोप करत काळे यांच्यासह पदाधिकारी आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. दरम्यान आयुक्त गोरे यांनी उपायुक्त यशवंत डांगे यांचा चर्चेसाठी पाठविले होते; परंतु आंदोलनकर्त्यांनी डांगे यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला व आयुक्तांनी स्वत: येऊन चर्चा करावी, अशी मागणी केली. आंदोलनकर्ते या मागणीवर ठाम होते. आंदोलनात मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष खलील सय्यद, फारुख शेख, उपाध्यक्ष अनंत गारदे, अनिस चुडीवाला, ॲड. अक्षय कुलट, प्रवीण गिते आदींचा सहभाग होता.
..............
०६ काँग्रेस आंदोलन