श्रीरामपूर : श्रीरामपूर संगमनेर मार्गावर खंडाळ्यानजीक अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन तरुणी ठार झाली. घटनेनंतर वाहनचालक पसार झाला. मयत तरुणीचे नाव पल्लवी विलास रहाणे (वय २०) असे आहे. खंडाळा उक्कलगाव रस्त्यावरील वस्तीवर ती राहते. खंडाळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पल्लवी शिक्षण घेत होती. बुधवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे संस्थेत सायकलवर चालली असता अज्ञात वाहनाने तिला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यानंतर चालक वाहनासह फरार झाला. स्थानिक लोकांनी पल्लवी हिला श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात तातडीने उपचारासाठी भरती केले. मात्र तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला होता.
घटनास्थळावरील काही सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस वाहनाचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एम.के.शेलार तपास करत आहेत.
-------------