तिसगाव : मायंबा, वृद्धेश्वर देवस्थान जोडरस्त्यांवरील घाटात पावसाने कोसळणाऱ्या दरडी दोन्ही देवस्थानांच्या वतीने हटवण्यात आल्या. तसेच रस्त्यावरील खड्डेही बुजविण्याचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले.
भाविकांच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या तक्रारीकडे बांधकाम विभागाकडून कायम दुर्लक्ष केले जात असल्याने ही मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, गणेश पालवे यांनी दिली. सावरगाव गंगादेवी, वेलतुरी, शेडाळा, शेंडगेवाडी आदी गर्भगिरी डोंगररांगांतील गावांना तिसगावसह पाथर्डी शहरात जाण्यासाठी हे दोन्ही घाटरस्ते महत्त्वाचे आहेत.
देवस्थानच्या वतीने दुरुस्ती मोहीम सुरू केली असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र म्हस्के, गणेश पालवे, दूध संस्थेचे अध्यक्ष शरद पडोळे, केशवराव अडसरे, कानिफनाथ पाठक, मोहनराव शिरसाठ, मिठू पालवे, माऊली पाठक आदींसह ग्रामस्थांनीही या मोहिमेत भाग घेऊन श्रमदान केले. दुपारनंतर जेसीबी यंत्रही मोहिमेत सहभागी करण्यात आले. त्यामुळे दुरुस्ती कामाला गती आली. पावसाळ्याच्या कालखंडात जशी गरज पडेल, तशा पद्धतीने घाटरस्त्यातील अडथळे दूर करण्यासाठी घाटशिरस, सावरगाव ग्रामपंचायतीकडूनही मदतीचा हात देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
----
३१ मायंबा घाट
वृद्धेश्वर - मायंबा घाटरस्त्यावर पडलेल्या दरडी बाजूला करण्यात आल्या.