लोकमत न्यूज नेटवर्क
कोतूळ : कोतूळ ग्रामपंचायत सर्वात जास्त उत्पन्नाची म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अतिसंवेदनशील असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक विरोधकांचा सामना यंदा टळला असला तरी पिचड - लहामटे समर्थक मातब्बर नेत्यांनी एकत्र येत मोठी ताकद उभी केली आहे. मात्र, प्रत्येक प्रभागात नेत्यांना सामान्य कार्यकर्त्यांनी आव्हान दिले आहे.
कोतूळ ग्रामपंचायत अकोले तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. एकूण १७ जागा व साडेसहा हजारांच्या घरात मतदार असून, त्यात सहाही प्रभातातून जोरदार लढती होणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी ९ जागा खुल्या महिला १ तर आरक्षित २ अनुसूचित जाती १, नागरिकांचा मागास प्रवर्ग १, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ३ असे आरक्षण आहे.
गेली दहा वर्षे ग्रामपंचायतीवर वर्चस्व असलेल्या बी. जे. देशमुख गटाने यंदा पॅनल उभे केले नाही, तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख व अगस्तीचे संचालक बाळासाहेब देशमुख यांचे बंधू राजेंद्र देशमुख या मातब्बर नेत्यांनी एकत्र येत ‘ग्रामविकास मंडळ’ उभे केले आहे, तर प्रत्येक प्रभागातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येत मातब्बर नेत्यांना ‘जनसेवा ग्रामविकासच्या’ माध्यमातून सामान्य व नवखे उमेदवार देत मोठे आव्हान उभे केले आहे.
कोतुळात निवडून आलेल्या सदस्यांना काही नेते तालुक्यात वरिष्ठांच्या सलामीला नेतात. हीच आपली ताकद म्हणून एखाद्या तिकिटावर दावा करतात. मात्र, नेत्यांच्या पुनर्वसनात गावकीत भावकी पिढ्यान् पिढ्या उभी राहिली आहे, हे सत्य टाळता येत नाही.
......
...या ‘देशमुखांच्या’ लढतीकडे लक्ष
प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख विरूद्ध विकास देशमुख, तर प्रभाग क्रमांक ६मध्ये राजेंद्र देशमुख विरूद्ध अरविंद देशमुख व प्रभाग ४मध्ये अनिल देशमुख विरूद्ध संजय देशमुख या लढती चुरशीच्या होत आहेत. या लढतींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
....