अशोक कारखान्याची ६२ वी सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी मुरकुटे बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ, उपाध्यक्ष पोपटराव जाधव, रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सुरेश गलांडे, सोपान राऊत, दिगंबर शिंदे, लाल पटेल, हिम्मत धुमाळ, अभिषेक खंडागळे आदी उपस्थित होते.
मुरकुटे म्हणाले, देशात साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा अधिक झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून साखर कारखानदारीचे अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे अनेक कारखाने तोट्यात गेले असून कर्जाच्या बोजाखाली सापडले आहेत. या संकटातून बाहेर पडायचे असेल तर साखर उत्पादन घटवून अल्कोहोल व इथेनॉलचे उत्पादन वाढवावे लागेल. यादृष्टीने कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता चार हजार टन वाढविली जाणार आहे.
अल्कोहोल व इथेनॉल प्रकल्पाची दैनंदिन क्षमता ६० हजार लिटर वाढविली जाणार आहे. त्यासाठी ७६ कोटी ५५ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून जिल्हा बँकेने कर्ज पुरवठ्याची तयारी दर्शविली असे मुरकुटे यांनी सांगितले.
ग्रामीण भागाच्या हितासाठी सहकार चळवळ टिकविणे व तिचे प्रामाणिकपणे संवर्धन करणे गरजेचे आहे. आजवर सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून अशोक कारखान्याचा कारभार केला. यापुढील काळातही सभासदाच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. अशोकने अडचणीच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला भाव दिला.
यावर्षीच्या गळीत हंगामात साखरेपेक्षा बी हेवीचा वापर करुन अल्कोहोल व इथेनॉल उत्पादनावर भर दिला. त्यामुळे साखर उतारा कमी दिसत असला तरी त्याचा पुढील वर्षाच्या एफआरपीवर परिणाम होणार नाही, असे मुरकुटे म्हणाले.
सभेच्या चर्चेत शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे, जितेंद्र भोसले, युवराज जगताप, दिलीप मुठे, प्रताप पटारे, दादासाहेब औताडे, रमेश ढोकचौळे, सुधाकर खंडागळे, महेश पटारे, रामदास पटारे, यशवंत नाईक यांनी सहभाग घेतला. अल्कोहोल व इथेनॉल प्रकल्प क्षमता वाढीचा व्यवस्थापनाने फेरविचार करावा. बी हेवी अल्कोहोल व इथेनॉलकडे वळविल्याने साखर उतारा कमी मिळत असून त्याचा पुढील एफआरपीवर परिणाम होण्याची भीती संघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केली.
-----