अकोले : आदिवासींसाठी शिक्षणाची कवाडे खुल्या करणाऱ्या आदिवासी उन्नती सेवा मंडळ या संस्थेने अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांमधील २३ वर्ग बंद करण्याचा निर्णय संबंधित सात आश्रमशाळांना कळविला असून त्यानुसार कमी विद्यार्थी पटसंख्येच्या कारणास्तव १ जुलैला हे वर्ग बंद करण्यात आले आहेत.१ जुलै २०१६ ला आदिवासी उन्नती सेवा मंडळाने तालुक्यातील मान्हेरे, खडकी, शेंडी, कोथळे, देवठाण,एकदरे,राजूर येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांतील २३ वर्ग बंद केले. पटसंख्या कमी असल्याने शासनाच्या निर्णयामुळे हे वर्ग बंद करण्यात आले आहेत.या वर्गांमधील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याची जबाबदारी संबंधित वर्ग शिक्षक व मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे ३० पेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवता येणार नसल्याने व शासनाकडून भोजन अनुदान मिळणार नसल्याने हे वर्ग बंद करण्यात आले आहेत. सात आश्रमशाळांमधील २९१ विद्यार्थ्यांचे इतर शाळांत समायोजन होईल व शिक्षणाचा प्रश्न काही अंशी मार्गी लागेल, पण जवळपास ५७ शिक्षक कर्मचाऱ्यांचा समायोजनाची समस्या भेडसावणारी आहे. त्यामुळे शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यांनीही समायोजनाची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
आश्रमशाळांतील २३ वर्ग बंद
By admin | Updated: July 7, 2016 23:25 IST