अहमदनगर : महापालिकेतील वरिष्ठ लिपिकांसह स्वीय सहायक पदावर तेच ते कर्मचारी कार्यरत आहेत. वर्षानुवर्षे बदल्या होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे हितसबंध तयार झाले आहेत. अन्य विभागात बदली केल्यास हे कर्मचारी आपले वजन वापरून पुन्हा त्याच टेबलावर हजर होतात. त्यामुळे त्यांची महापालिकेत एक प्रकारे एकाधिकारशाही निर्माण झाली आहे.
महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांच्या इतर जिल्ह्यांमध्ये बदल्या होत नाहीत. त्यामुळे तेच ते अधिकारी एका पदावर कार्यरत आहेत. विभागप्रमुख जसे बदलत नाहीत, तसे वरिष्ठ लिपिक व स्वीय सहायकही बदलले गेले नाहीत. वर्षानुवर्षे एका टेबलावर काम केल्याने त्यांचे ठेकेदार, पदाधिकारी, नगरसेवकांशी हितसंबंध तयार झाले आहेत. एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली केल्यास कामकाज ठप्प होते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. वरिष्ठांनाही नवीन कर्मचारी नको असतात. त्यामुळे तेही बदली झाली तरी कर्मचाऱ्यांना सोडत नाहीत. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास काम थांबू नये, यासाठी पर्यायी कर्मचारी तयार ठेवणे, ही पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी सरकारने दर तीन वर्षांनी बदली करण्याचा नियम केला आहे. कर्मचाऱ्यांच्या एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली केल्यास पर्यायी कर्मचारी तयार होतील; पण बदलीचा निर्णय घेणार कोण, असाही प्रश्न आहे. कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच टेबलावर काम करत असल्याने प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे अन्य कर्मचाऱ्यांना संधी मिळत नाही. हा एक प्रकारे त्यांच्यावर अन्यायच आहे. यावर कुणी आवाज उठवीत नाही. प्रशासकीय कामकाजाबाबत पदाधिकारी व नगरसेवकांकडून सभागृहात नाराजी व्यक्त केली जाते; परंतु कामात सुसूत्रता आणण्यासाठी ठोस निर्णय होत नाही. या उलट केलेली बदली रद्द करण्यास प्रशासनाला भाग पाडले जाते.
.....
वसुलीचा बट्ट्याबोळ
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याची पदाधिकारी व नगरसेवकांची मागणी आहे; परंतु वसुली होत नाही. प्रभाग कार्यालयनिहाय वसुली लिपिकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नसल्याने त्यांचे हितसंबंध तयार झालेले आहेत. त्याचा परिणाम वसुलीवर होत आहे. प्रभागांतर्गत त्यांच्या बदल्या करणे शक्य आहे; परंतु त्याही केल्या जात नाहीत. त्याचा परिणाम करवसुलीवर झाला आहे.