सोलापूर : शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर किरण रामभाऊ जाधव (वय-२७, रा. अहमदनगर, हल्ली निवासी डॉक्टर वसाहत, शासकीय रुग्णालय, सोलापूर) यांनी दोन इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली़ ‘बी’ ब्लॉकमधील बालरोग विभागातील रुममध्ये डॉ. जाधव हे शनिवारी सायंकाळी सव्वापाच ते साडेपाचच्या दरम्यान आले. त्यांनी आतून कडी लावून जीवनयात्रा संपवली. दरम्यान, डॉ. रवीशेखर पाटील यांना रुम बंद असल्याचे दिसले. एकाने स्ट्रेचरवर चढून वरच्या खिडकीच्या काचेतून पाहिले असता डॉ. जाधव हे निपचित पडल्याचे दिसून आले. डॉ. प्राची राऊत यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल केले. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, त्यातील मजकूर मात्र समजू शकला नाही.बझार पोलीस ठाण्यात या घटनेची उशीरापर्यंत नोंद नव्हती़ (प्रतिनिधी)