मंगळवारी (दि. २७) रोटरी क्लब संगमनेरचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. नूतन अध्यक्ष योगेश गाडे यांनी मावळते अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांच्याकडून अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. सचिवपदी ऋषिकेश मोंढे, तर उपाध्यक्षपदी महेश वाकचौरे यांची निवड करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, रोटरीचे माजी प्रांतपाल प्रमोद पारीख, सहप्रांतपाल दिलीप मालपाणी आदी उपस्थित होते.
तांबे म्हणाल्या, संगमनेर नगरपालिकेच्या आवारात सुरू असलेल्या रोटरी नेत्र रुग्णालयाने जागतिक स्तरावर आपली छाप सोडली आहे. संगमनेर रोटरीच्या कामाची जागतिक स्तरावर दखल घेतली असून रुग्णालयाच्या आवारात आय बँक होण्यासाठी नगर परिषदेमार्फत शासन स्तरावर या योजनेच्या मंजुरीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल. माजी प्रांतपाल पारीख यांनी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या रोटरीच्या कामाबद्दल माहिती दिली. आमदार डॉ. तांबे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे कौतुक केले. लातूर येथील मानवता विकास प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय मानव विकास पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मावळते अध्यक्ष वर्मा व श्री.श्री. रविशंकर विद्यालयाच्या अध्यक्षा स्वाती शाह यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. सागर गोपाळे व विश्वनाथ मालाणी यांनी केले. सचिव मोंढे यांनी आभार मानले.