श्रीगोंदा : स्व. शिवाजीराव नागवडे यांची मातृभूमी असलेल्या वांगदरी ग्रामपंचायत निवडणुकीत १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे येथे चुरशीची लढत होत आहे.
पाच दशकांपासून वांगदरी ग्रामपंचायतीवर नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे वर्चस्व आहे. मात्र, यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी सत्ता परिवर्तनासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत किसान क्रांती मंडळाचे चार बिनविरोध, तर पाच जण निवडून आले होते. संदीप नागवडे यांच्यासह भाजपचे चार जण निवडून आले होते. त्यामुळे विरोधकांचा ग्रामपंचायतीमध्ये चंचूप्रवेश झाला होता. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मध्ये संदीप नागवडे यांच्या विरोधात आदेश नागवडे यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे या प्रभागात मतदारांची चांदी होणार आहे.
प्रभाग ४ मध्ये विद्यमान उपसरपंच महेश नागवडे व राजेंद्र नीळकंठ नागवडे यांच्यात सामना रंगणार आहे.
निवडणूक प्रचारासाठी राजेंद्र नागवडे, बबनराव मदने, दत्तात्रय नागवडे, रामचंद्र नागवडे आदी सरसावले आहेत. त्यामुळे निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.