अहमदनगर : देवाची श्रद्धा आणि चोरी यांचा शोध घेणारी शनिशिंगणापूरवरील स्टोरी आता ‘चौर्य’ या चित्रपटातून पडद्यावर साकारणार आहे. रोमांचकारी ‘चौर्य’चे चित्रीकरण राजस्थानमधील चंबळच्या खोऱ्यात झाले आहे. दरवाजा नसलेल्या घरांची स्टोरी या चित्रपटातून उलगडणार आहे. ५ आॅगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील कलाकारांनी गुरुवारी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट देवून चित्रपट निर्मितीचा प्रवास उलगडला.शाळा, फँड्री, सिद्धांत अशा सरस चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईचे नीलेश नवलखा, विवेक कजारिया, अश्विनी पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजन आमले हे सहनिर्माते आहेत. समीर आशा पाटील हे नव्या दमाचे लेखक-दिग्दर्शक या चित्रपटातून पदार्पण करीत आहेत. किशोर कदम, गणेश यादव, मिलिंद शिंदे, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास,दिनेश लता शेट्टी, तीर्था मुरबाडकर आणि श्रुती कुलकर्णी आदींच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.या चित्रपटाविषयी लेखक-दिग्दर्शक समीर पाटील म्हणाले, जागृत देवस्थान असल्याने शिंगणापूर गावात चोरी होत नाही. चोरी करणाऱ्यांना देव शिक्षा करतो,अशी गावातल्या रहिवाशांची धारणा असते. त्यामुळे गावातल्या घरांना दरवाजे नसतात. परंतु एकाएकी या देवळातच चोरी होते आणि लोकांच्या श्रद्धेला तडा जातो. अंगावर शहारे आणणाऱ्या या ‘सस्पेन्स थ्रिलर’ची अनोखी सांगड असल्यामुळे चित्रपटात पुढे नक्की काय घडतं यासाठी चित्रपट पहावा लागणार आहे. ह्यउत्तम कथा, लोकेशन्स आणि सस्पेन्स थ्रिलरची सांगड यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मयुरेश केळकर यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केलं आहे. लोककला आणि आताच्या काळाची सांगड घालणारे गाणे प्रा. गणेश चंदनशिवे यांनी गायले आहे. या गाण्याबद्दल केळकर म्हणाले, शंकरराव धामणीकर यांचं १९६० मधील पारंपरिक पद्धतीचं गीत ‘देवा वाचून सुनं, माझं झुरतंय मन’ हे गाणं चित्रपटात वापरले आहे. लोककलेतील गोंधळ जागरणाच्या माध्यमातून हे गाणं चित्रित करण्यात आले असून प्रा. चंदनशिवे यांनीच गाणे सादर केले आहे.अंध-कर्णबधिरांना मिळणार चित्रपटाचा आनंदनिलेश नवालखा म्हणाले, मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘अॅक्सेसेबिलीटी फॉर्मेट’ चा अभिनव प्रयोग या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यामुळे अंध आणि कर्णबधिरांनादेखील या चित्रपटाचा आनंद हा सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणे घेता येणार आहे. त्यासाठी खास युरोपियन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. पुणे येथील एका स्वतंत्र चित्रपटगृहात रोटरी क्लबच्या सहकार्याने अंध-कर्णबधिरांना चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी सात शो आयोजित केले आहेत. खुर्चीला हेडफोन दिले तर अंधाना चित्रपट बघता येतो, मात्र असे तंत्रज्ञान आपल्या देशात उपलब्ध नाही. त्यामुळे आमचा प्रयोग भारतात पहिल्यांदाच होतो आहे.चित्रपटात नावे नसलेली पात्रंचित्रपटातील कोणत्याही पात्रांना नावे देण्यात आलेली नाहीत. बाई, इसम अशीच नावे पात्रांना दिली आहेत. कोणाच्या चेहऱ्यावर कोणाचा मुखवटा आहे. व्यक्तीरेखांचा चेहरा ओळखण्यात सावळा गोंधळ आहे. पात्र बोलत नाहीत, तर फ्रेम बोलतात. हीच मजा चित्रपटातून दाखविली आहे. राजस्थानातील चंबळ खोऱ्यात पोलीस संरक्षणात चित्रपटाचे शुटिंग करण्यात आले आहे. तेथील किस्सेही पाटील यांनी सांगितले.
चंबळच्या खोऱ्यात साकारला ‘चौर्य’
By admin | Updated: July 21, 2016 23:56 IST