संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहमदनगर जिल्ह्यातील ४०० एसटी बसेसला ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात आले आहे. प्रवाशांचे कोरोनाबरोबरच इतरही संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होण्यासाठी हे कोटिंग करण्यात आले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन अनेक प्रवाशांकडून होताना दिसत नाही.
‘गाव तेथे एसटी; रस्ता तेथे एसटी’ हे ब्रीद महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने जपले आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जातो. एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी तसेच प्रवाशांच्या आरोग्याची काळजी म्हणून परिवहन महामंडळाच्या बसेसला ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात आले. बसमध्ये अनेक ठिकाणी प्रवाशांचा स्पर्श होतो. त्यामुळे कोरोनाबरोबरच इतरही संसर्गजन्य आजारांचा धोका यामुळे टळणार असल्याचे परिवहन महामंडळाकडून सांगण्यात येते.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा. बसमध्ये गुटखा, पान, तंबाखू खाऊन थुंकू नये. बसमध्ये स्वच्छता ठेवावी. परिवहन महामंडळाची बससेवा आपल्या सर्वांच्या सोयीसाठीच आहे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून बसस्थानकांवर ध्वनिक्षेपकातून, प्रबोधनात्मक फलकांद्वारे करण्यात येते. मात्र, असे असले तरीदेखील बसमधून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचा तोंडाला मास्क लावलेला नसतो. काहींचे मास्क हनुवटीवर असतात. काही जण बसमध्ये थुंकतात. खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर बसमध्येच कागद, रॅपर फेकून देतात. पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या, निम्या अर्ध्या भरलेल्या बाटल्या बसमध्येच सिटखाली पडलेल्या दिसतात. त्यामुळे बस खराब होते. परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. मात्र, बसमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी चुकीच्या पद्धतीने वागतात. याबाबत सुज्ञ प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
--------------------
‘काका मास्क लावा ना’
नाशिकहून पुण्याला जात असताना संगमनेर बसस्थानकात गाडी थांबली. मध्यम वयाची एक व्यक्ती गाडीत येऊन बसली. त्या व्यक्तीने तोंडाला मास्क लावलेला नव्हता. ‘काका मास्क लावा ना’ अशी विनंती त्यांना केली. त्यावर त्यांनी ‘मी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मास्क लावायची आता गरज नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे मीच दुसऱ्या सीटवर जाऊन बसलो, असा अनुभव नाशिक-पुणे प्रवास करणाऱ्या एका तरुणाने ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
--------
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांची काळजी घेते आहे. मात्र, प्रवाशांनीदेखील बसमध्ये शिंकताना, खोकत असताना काळजी घेतली पाहिजे. कंडक्टरने सूचना देऊनही काही प्रवासी मास्क लावत नाहीत. त्यांच्या बेफिकिरीचा इतरांना त्रास होतो. विशेषत याबद्दल महिलांना काहीच बोलता येत नाही. त्यामुळे बसमध्ये प्रवास करताना कोरोनाची भीती वाटते. सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे.
-नयना पंजे, संगमनेर.
-------------
संगमनेर आगारात प्रवासी बसची एकूण संख्या ५३ इतकी आहे. या सर्व बसेसला ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात आले आहे. दर दोन महिन्यांनी सर्व बसेसला पुन्हा कोटिंग केले जाणार आहे. कोरोना रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे प्रवाशांनी पालन करावे. बसमध्ये स्वच्छता ठेवावी.
नीलेश करंजकर, आगारप्रमुख, संगमनेर