लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : वाकोडी परिसर, सुर्यानगर, निर्मलनगर परिसरात घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि़२) रात्री जेरबंद केली़ वाकोडी परिसरात या टोळीला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले़स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त खबऱ्यामार्फत वाकोडी फाटा येथे घरफोडी करणारी टोळी येणार असल्याची माहिती मिळाली़ त्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, मन्सूर सय्यद, सुनिल चव्हाण, भाऊसाहेब काळे, उमेश खेडकर, पोलीस नाईक दत्ता हिंगडे, संदीप पवार, संदीप घोडके, रावसाहेब हुसळे, भागीनाथ पंचमुख, विशाल अमृते, योगेश सातपुते, प्रमोद जाधव, चालक बाळासाहेब भोपळे, बबन बेरड यांनी वाकोडी फाटा येथे सापळा लावला़ मात्र, पोलिसांना पाहताच आरोपींनी धूम ठोकली़ पोलिसांनी त्यांना पाठलाग करुन पकडले़ जावेद आजिनाथ काळे (वय २० ), गणेश दिवानजी काळे (वय २०), करण फप्या काळे (वय २०, तिघेही रा़ वाकोडी शिवार, ता़ नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत़ वाकोडी, सुर्यानगर, निर्मलनगर परिसरात घरफोडी केल्याचे आरोपींनी कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले़
घरफोडी करणारी टोळी जेरबंद
By admin | Updated: July 3, 2017 13:44 IST