जवळा : जामखेड तालुक्यातील दहा हजार लोकसंख्येचे जवळा गाव तसेच लगतच्या १५ गावातील वीस हजार लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जवळा येथे ग्रामीण रुग्णालय करण्यास मान्यता मिळावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक पाटील यांनी केली.
याबाबतचे निवेदन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते प्रदीप दळवी, अशोक पठाडे, ग्रामस्थांनी आमदार रोहित पवार यांना दिले आहे. जवळा हे जामखेड तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. गावालगत तब्बल १५ लहान मोठी गावे आहेत. या सर्व ठिकाणची लोकसंख्या गृहीत धरली तर ती ३० हजारहूनही अधिक आहे. मात्र एवढ्या लोकसंख्येसाठी जवळा येथे केवळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्रामार्फत मिळणाऱ्या आरोग्य सुविधा खूपच अपुऱ्या पडत असून लोकांना खासगी हाॅस्पिटलमध्ये जाऊन महागडे वैद्यकीय उपचार करण्याशिवाय पर्याय उरत नाहीत. बहुतांशवेळा जामखेड किंवा करमाळा येथे जाऊनच रुग्णांना वैद्यकीय उपचार करण्याची वेळ येते. या भागातील लोकांना कोरोना लस, कुत्रा, विंचू व साप चावल्यावरची लस घेण्यासाठीही जामखेड किंवा नान्नजलाच जावे लागते. त्यामुळे येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.