नगर तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या जेऊर गावांमध्ये जुलै २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. आजतागायत येथे कोरोनाचे एकूण ११४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १०८ रुग्ण बरे झाले तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. चालू स्थितीत मार्चच्या सुरुवातीलाच जेऊरमध्ये आठ रुग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली होती. आज गावामध्ये सक्रिय रुग्ण संख्या शून्य असल्याने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश आल्याचे दिसून येत आहे.
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १६ गावांमध्ये आजपर्यंत ४३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सद्य:स्थितीत २० रुग्ण उपचार घेत आहेत, तर ३९४ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आजपर्यंत १०७३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य केंद्रात आजपर्यंत ७७७ जणांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू असून पात्र व्यक्तींनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
.............
नो मास्क नो एन्ट्री
गावातील प्रत्येक व्यावसायिकांनी ‘नो मास्क नो एन्ट्री’ या तत्त्वाचा अवलंब करावा. प्रत्येकाने मास्क लावणाऱ्या ग्राहकांनाच वस्तूंची खरेदी- विक्री करू द्यावी. स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे.
-डॉ. योगेश कर्डिले (प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर)
खबरदारी घेणे गरजेचे
जेऊर गावात आजमितीला एकही कोरोनाबाधित रुग्ण अस्तित्वात नाही. ही गावासाठी समाधानाची बाब आहे; परंतु नागरिकांनी निष्काळजीपणा न दाखवता खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन नागरिकांनी करावे.
-सौ. राजश्री मगर (सरपंच)
_------------------------------------------------------------