लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष स्वतंत्र पॅनल उभे करणार आहे. पक्षातील इच्छुकांना अर्ज दाखल करण्याच्या सूचनाही वरिष्ठांकडून करण्यात आल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जिल्ह्यातील भाजप नेत्यांची मंगळवारी सायंकाळी बैठक झाली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जिल्हा बँकेच्या सर्व २१ जागांवर उमेदवार उभे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत झाला. पक्षात जे इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करावेत. पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपाच्या पॅनलचे नेतृत्व माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे यांच्याकडे सोपविण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत महाविकास आघाडीचे पॅनल उभे करण्याचा निर्णय झाला. या निवडणुकीसाठी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली. उपमुख्यमंत्री पवार पाठोपाठ विरोधी पक्षनेते फडणवीस यांनीही जिल्ह्यातील भाजाप नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीस माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री राम शिंदे, महापौर बाबासाहेब वाकळे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, सुजित झावरे, कार्यकारिणीचे सदस्य भानुदास बेरड, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, उत्तर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर आदी उपस्थित होते.
.....
आजी-माजी आमदारांची स्वतंत्र बैठक
विकास सेवा सहकारी संस्थांसाठी सर्वाधिक १४ जागा आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक जागा असल्याने याबाबत फडणवीस यांनी जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत तपशील समजू शकला नाही. मात्र तालुक्यातील या एका जागेची जबाबदारी आजी-माजी अमदारांवर सोपविली असल्याची चर्चा आहे.
.....
जिल्हा बँकेचे अध्यक्ष गायकरांनीही लावली हजेरी
जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनीही मुंबई येथील बैठकीस हजेरी लावली. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यासह माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी गायकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला असून, ते आता भाजपमध्ये असल्याने त्यांनाही बैठकीचे निमंत्रण होते.
...