दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव व सुलतानपूर ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने परिवर्तन मंडळाला नाकारत सत्ताधाऱ्यांच्याच हाती पुन्हा सत्तेची दोरी दिली आहे. भावीनिमगाव ग्रामपंचायतीत ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक व भावीनिमगाव सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद माधवराव कुलकर्णी यांच्या गटाने बाजी मारली.
माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ११ पैकी ११ जागा जिंकून कुलकर्णी गटाने सत्ता राखण्यात यश मिळविले. या विजयामुळे भावीनिमगाव सेवा संस्थेसह ग्रामपंचायतीतही कुलकर्णी गटाकडे एकहाती सत्ता आली आहे. या निवडणुकीत तरुण अपक्ष उमेदवारांनी मिळविलेली भरघोस मते चर्चेचा विषय ठरली. परिवर्तन मंडळाचे नेतृत्व उदय शिंदे, रामकृष्ण मुंगसे यांनी केले.
सुलतानपूर (मठाचीवाडी) ग्रामपंचायतीत पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब धोंडे यांच्या गटाने बाजी मारली. एकूण ९ जागांपैकी ७-२ ने सत्ता राखण्यात त्यांना यश मिळाले. सत्ताधाऱ्यांच्या दोन तर विरोधी गटाची एक अशा तीन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. ६ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना ५ तर विरोधकांना १ जागा मिळाली. परिवर्तन मंडळाचे नेतृत्व कल्याण जगदाळे यांनी केले.
दरम्यान, निवडणूक निकालानंतर आता सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गावातील पारावर, चौकात, टपरीवर सरपंच पदाचा उमेदवार कोण? याबाबत खमंग चर्चा घडत आहेत. तर आरक्षण सोडतीनंतर सरपंचपद मिळविण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळू शकते असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.