अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य नियुक्तीला आमदार संग्राम जगताप यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. ही याचिका दाखल करून घेत स्थायी समिती नियुक्त करण्याबाबत झालेल्या सभेचे इतिवृत्त आणि ठराव सादर करावेत, असे आदेश खंडपीठाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत.महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी २० जुलै रोजी सभा झाली. या सभेत स्थायी सदस्यांच्या नियुक्त्या नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहेत. त्यामुळे या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी करणारी याचिका आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या २२ नगरसेवकांच्या सहीने खंडपीठात दाखल केली आहे. या याचिकेमध्ये महापौर, आयुक्त, नगरसचिव यांच्यासह सदस्य म्हणून नियुक्त झालेल्या आठ जणांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. सोमवारी ही याचिका दाखल करून घेत खंडपीठाने महासभेचे इतिवृत्त आठ दिवसात सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती के. एल. वडणे यांच्या खंडपीठाने महापालिकेला दिले आहेत. या प्रकरणात महापालिकेतर्फे अॅड. व्ही. एस. बेद्रे, आर. आर. मंत्री, दिलीप सातपुते यांच्यातर्फे आर. एन. धोर्डे, सचिन जाधव यांच्यातर्फे मुकुल कुलकर्णी काम पाहत आहेत.दरम्यान, काँग्रेसचे गटनेते संदीप कोतकर यांनी त्यांच्या पदाचा ५ एप्रिल २०१६ रोजी राजीनामा दिला आहे. त्याच दिवशी सुवर्णा कोतकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने समद खान कोठडीत असल्याने संपत बारस्कर यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी सूचविलेली नावे राजकीय दबावापोटी ग्राह्य धरली नाहीत.आधी त्यांना गटनेतेपदाचे पत्र दिले, नंतर ते रद्द केले. नगरसचिवांचे कृत्य नियमबाह्य आहे, असे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे गटनेतेपदाचा फैसला आता खंडपीठातच होणार आहे. (प्रतिनिधी)
इतिवृत्त सादर करण्याचा खंडपीठाचा आदेश
By admin | Updated: July 26, 2016 00:03 IST