श्रीरामपूर : महावितरण कंपनीने मीटर रीडिंग घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने लोक नेमले आहेत. प्रत्यक्ष मीटरचे रीडिंग न घेताच परस्पर बिले पाठविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसत आहे. वाढीव बिलांची तक्रार केल्यास महावितरणकडून ही या तक्रारींची दखल घेतली जात नाही, हे विशेष !
महावितरण कंपनीचे लाखोंच्या घरात वीज व शेती ग्राहक आहेत. या सर्वांचे मीटर रीडिंग घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यांचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून काही वेळा परस्पर वीजबिले पाठविली जातात. प्रत्यक्ष मीटर रीडिंग आणि बिलांमधील रीडिंग यामध्ये तफावत आढळून येते. वाढीव वीजबिल पाहून ग्राहक संतप्त होतात आणि वादाला तोंड फुटते, असेच चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.
मात्र या प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीने ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविण्याची खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील अनेक ग्राहकांनी त्याचा लाभ घेत आहेत. या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेतले जाते. दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवसआधी रीडिंग पाठविण्याची एसएमएसद्वारे विनंती करण्यात येते. त्यानंतर चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल ॲप किंवा एसएमएसद्वारे मीटरमधील केडब्लूएच (kWh) रीडिंग पाठविता येत आहे.
.......................
महावितरणकडून ग्राहकांची लूट
महावितरणच्या ऑनलाईन ॲपवर तक्रार केल्यास काही तासातच ही तक्रार निकाली निघाल्याचे मेसेज येतो. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक कार्यालयात संपर्क करण्यास सांगितले जाते. स्थानिक कार्यालयात गेल्यानंतर तेथे मीटर सदोष असू शकतो, तपासून घ्या असा सल्ला मिळतो. मीटर तपासणीसाठी आगाऊ पैसे भरुन घेतले जातात. मात्र, महिना उलटला तरी मीटर तपासणीसाठी महावितरणचा तंत्रज्ञ येत नाही. याबाबत विचारणा करण्यास गेल्यानंतर उलट बोलून ग्राहकांना माघारी पाठविले जाते. अगोदरच दुपटीने बिल, त्यात मीटरचे तपासणीही नाही अन् मीटर तपासणीचे पैसे घेऊन महावितरणकडून अशा पद्धतीने ग्राहकांची लूट सुरु आहे.
--------
रीडिंग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. मीटर रीडिंग कसे पाठवावे याबाबत महावितरणच्या तसेच इतर सामाजिक माध्यमावर प्रात्यक्षिकासह व्हिडीओ उपलब्ध आहेत. विविध फायद्यांमुळे या सुविधेचा वापर करून वीजग्राहकांनी दरमहा मीटर रीडिंग पाठवावे.
-विकास अढे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण कंपनी.
-------
जास्त बिल आल्याची तक्रार केली होती. त्यावर त्यांनी मीटर तपासणीचा सल्ला दिला. मीटर तपासणीसाठी अगोदर १७०० रुपये भरुन घेण्यात आले. पैसे भरुन महिना झाला आहे, तरीही मीटर तपासणीसाठी कोणीही आलेले नाही. याबाबत विचारणा करायला गेलो तर दोन दिवस तुमची वीज बंद करावी लागेल, असे सांगत अधिकारी अरेरावी करतात.
-संदीप पाटील, नवनागापूर