अहमदनगर : रोहिणी, मृग, आर्द्रा हे नक्षत्र ओळीने कोरडे गेले आहेत. पावसाळ्यातील सुमारे महिनाभराचा कालावधी संपला आहे. रविवार (दि.६) पासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले आहे. जिल्ह्यातील धरणात असणारा पाणी साठा दिवसागणीक आटू लागला आहे. यामुळे शेतकरी, प्रशासन आणि राज्य शासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. साडे चार लाख हेक्टर क्षेत्र असणाऱ्या खरीप हंगामासाठी अवघी टक्काभरही पेरणी झालेली आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपलेली आहे. मात्र, जिल्ह्यात कोठेच दमदार पाऊस झालेला नाही. पाऊस आणखीन लांबल्यास माणसांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा कोठून उपलब्ध करायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरीप हंगामातील कडधान्य पिके पावसाअभावी वाया गेली असून अन्य पिकांची पेरणी होती की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात १५६१ स्वतंत्र तर ४३ प्रादेशिक पाणी योजना आहेत. या पाणी योजना धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून असून धरणांनी तळ गाठला असल्याने योजना चालणार कशा आणि शहरी भागात पाणी मिळणार कसे हा प्रश्न आहे. जिल्ह्यात गत महिनाभरात अवघा ८ टक्के पाऊस झाला असून नगरशहरात त्याचे प्रमाण थोडे फार आहे. गत वर्षी जुलै महिन्यात २९ टक्के पाऊस झाला होता. यामुळे खरीप हंगामाची स्थिती चांगली होती. यंदा नेमके उलटे चित्र आहे. या दिवसात पावसाच्या आषाढी पाळ्या (सरीवर) बाजरीची वाढ होत असते. पण यंदा स्थिती भयानक आहे. सर्वांना पावसाची आस आहे. (प्रतिनिधी) धरणातील पाणीसाठा (दक्षलक्ष घनफूटमध्ये)मुळा ५ हजार ९, भंडारदरा ६८७, निळवंडे ५०८, आढळा १५७, मांडओहळ १७१.१९, घोड १९७२, सीना २०९, खैरी २९.१५, विसापूर १३, मुसळवाडी ५२.१२, टाकळीभान ११.३४ असे आहे.जिल्ह्यात सध्या ३१७ टँकरव्दारे २८० गावे आणि ११५३ वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा सुरू आहे. या टँकरव्दारे साडेपाच लाख लोकसंख्येची तहान भागविण्यात येत आहे.
भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणांनी गाठला तळ
By admin | Updated: July 7, 2014 00:36 IST