बस अपघातात वीस भाविक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 16:48 IST
भीमाशंकर (ता.आंबेगाव) येथून औरंगाबादकडे भाविकांना घेऊन जाणारी आराम बस टाकळीढोकेश्वर (ता. पारनेर) येथील वासुंदे चौकात उलटून झालेल्या अपघातात वीस प्रवासी जखमी झाले.
बस अपघातात वीस भाविक जखमी
टाकळी ढोकेश्वर(अहमदनगर) : भीमाशंकर (ता.आंबेगाव) येथून औरंगाबादकडे भाविकांना घेऊन जाणारी आराम बस टाकळीढोकेश्वर (ता. पारनेर) येथील वासुंदे चौकात उलटून झालेल्या अपघातात वीस प्रवासी जखमी झाले. पैकी नऊ गंभीर जखमींवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात तर उर्वरित जखमींवर टाकळीढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नगर-कल्याण महामार्गावरील टाकळीढोकेश्वर येथे रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. शनिवारी सायंकाळी भीमाशंकर येथून ४६ भाविकांना घेऊन ही खासगी बस ( क्र.एम एच-०४ जीपी १३३४) औरंगाबाद येथील भुवनेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी जात होती. रविवारी मध्यरात्री दीड वाजता ही बस टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात आल्यानंतर गावठाण रस्ता ते बायपास रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ही बस पलटी झाली. यामध्ये वीस प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये सावित्री नायर, पी कौशल्य, चंद्रिका मेमन, लीला दयानंदन, प्रसन्ना कर्ण, विजयकुमार कर्ण, शारदा नायर, धनलाक्षिमी नायर, जी. आर. नायर, उषा नायर, पी. व्ही. नायर, व्ही. पी. घटनायर, मीनाक्षी नायर, लिली कुट्टी, आकाश गडक, प्रधुराव पाटील, चंद्रकांत तिवारी, शिवराम नाय्यर, रंजना रानांकुट्टी, शुरारे शंकरानंद यांचा समावेश आहेत. यातील नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व प्रवासी मुंबई येथील रहिवासी आहेत. पोलीस मित्र अनिल नांगरे यांनी टाकळीढोकेश्वर दूरक्षेत्राला अपघाताची माहिती दिल्यानंतर जखमींना १०८ या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.