अहमदनगर: गेल्या अडीच महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाचे शहरासह जिल्ह्यात आगमन झाले आहे़ दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असून, गुरुवारी सरासरी १३़ ३२ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ त्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे़जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडतो़ मात्र जून व जुलै पूर्णपणे कोरडा गेला़ आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले़ पण तो फारकाळ टिकला नाही़ अनुकूल वातावरण असूनही, पावसाने ओढ दिली़ एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे़ परंतु तो सर्वदूर नाही़ कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे़ जिल्ह्यात गुरुवारी १३़ ३२ मि़ मी़ पाऊस झाला़ दुसऱ्या दिवशीही काही भागात पाऊस पडला़ जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार संगमनेर तालुक्यात सर्वाधिक सरासरी ४० मि़ मी़ पाऊस झाला़ जामखेड परिसरात यापूर्वी अत्यल्प पाऊस झाला़ या तालुक्यात पाऊस सुरू असून, परिसरात गुरुवारी ३६ मि़ मी़ पाऊस झाला़ पूर्वीचा पाऊस नसल्याने खरिपाची पिके गेली़ नुकत्याच झालेल्या पावसामुळे रब्बीची पिके घेता येतील़ पाथर्डीमध्ये २० मि़ मी़ पाऊस झाला आहे़ या तालुक्यात यापूर्वीचा पाऊस नाही़ याठिकाणी हा पहिलाच पाऊस आहे़ तिसगाव, माणिक दौंडी, टाकळी मानूर, जोडमोहोज या भागाातच हा पाऊस झाला़ उर्वरित गावांत पाऊस नाही़ नेवासामधील काही भागात यापूर्वीचा पाऊस झाला़ त्यावर खरिपाची पेरणी झाली़ परंतु बहुतांश गावांत पेरण्या होऊ शकल्या नाहीत़ गेल्या दोन दिवसांपासून येथेही पावसाला सुरुवात झाली आहे़ नगर तालुक्यांत पाऊस नव्हता़ येथे गुरुवारी १८ मि़ मी़ पाऊस झाला असून, रब्बीची पिके घेणे शक्य आहे़शेवगाव शहरासह परिसरात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही़ पावसाअभावी येथे पेरण्या झाल्या नाहीत़ शेवगावमध्ये १ मि़मी़ पावसाची नोंद झाली असून, गुरुवारी याठिकाणी पाऊस झाला नाही़ कोपरगाव तालुकाही कोरडाच आहे़ येथे अवघा १ मि़मी पाऊस पडला़ यापूर्वीदेखील इथे पाऊस पडला नाही़ श्रीगोंदाही यास अपवाद नाही़ दरम्यान श्रीरामपूर तालुक्यात जोरदार पुनरागमन केले. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी परिसरात वादळीवाऱ्यासह गारा पडल्याने फळबागांसह शेतीचे नुकसान झाले.(प्रतिनिधी)
जिल्ह्यात सरासरी १३ मि़मी़ पाऊस
By admin | Updated: August 23, 2014 00:43 IST