हेमंत आवारी/प्रकाश महाले, अकोलेपर्यटनाचा नैसर्गिक वारसा लाभलेल्या तालुक्यातील विश्रामगड तथा पट्टा किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या जीवनातील आठवणींना उजाळा देणाऱ्या भिंतीचित्रांनी अंबरखाना सजला असून गडावर छत्रपतींचा १५ फूट उंचीचा धातूचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या शिवसृष्टीचे काम वेगात सुरु आहे़छत्रपती शिवाजी महाराज जालना स्वारीहून परतत असताना महाराजांची ३३६ वर्षांपूर्वी रायते वाघापूर (ता. संगमनेर) येथे मुघल सरदार रणमस्तखान याच्याशी चकमक झाली़ यात खान मारला गेला. शिवराय विश्रांतीसाठी पट्टाकिल्ल्यावर आले. येथे जवळपास १७ दिवस थांबले़ धोका टळल्यावर ते कल्याणमार्गे रायगडावर पोहोचले. पट्टा किल्ल्यावर त्यांचा शेवटचा दीर्घ मुक्काम ठरला. म्हणूनच या किल्ल्याला विश्रामगड हे नाव पडले़या गडावर २०१३ ला शिवरायांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. त्यावर दगडी चिऱ्यांची मेघडंबरी बसवण्यात आली आहे. अंबरखान्याचा परिसर सपाट करुन ५ हजार ३२५ झाडे लावली आहेत. तसेच येथे फुलांची ‘बाग’ ही साकारली आहे. ३५ दगडी शिवकालीन कुंडांची साफसफाई करण्यात आली. लोखंडी रेलींग, पाच पॅगोडे, एक टेहाळणी मनोरा, दगडी राजमहाल, अंबरखाना कचेरीचे ‘वॉटर प्रुफिंग’ केले आहे. अंबरखान्याचा अंतर्भागात महाराजांच्या जीवनावरील चित्रे लावली आहे. दोन शिवकालीन तळ्यांचे बळकटीकरण करुन डोंगरावरुन पाईपने पाणी खाली आणले आहे. सिन्नर दरवाजाची डागडुजी करण्यात आली असून गडाच्या पायथ्याला प्रवेशद्वार व पर्यटकांच्या विश्रांतीसाठी दोन पर्यटनगृहे साकारली आहे.काही महिन्यांपूर्वी उत्खननाच्या वेळी शिवकालीन धान्य कोठारे उजेडात आले आहे. तर ३१आॅगस्ट २०१५ ला अंबरखान्याजवळ सपाटीकरण करताना वन कामगारांना शिवकालीन मातीची भांडी,काही धातूची नाणी, एक लोखंडी गोळा, दगडी तबक-चिरे सापडली आहेत. या प्राचीन वस्तू वन विभागाने जपून ठेवल्या आहेत़ तर गडावरील सौर दिव्यांच्या बॅटऱ्या, बल्ब तसेच हायमास्ट दिव्यांचे केवळ लोखंडी सांगाडे उभे आहेत. आढळा परिसर व स्थानिक वन व्यवस्थापन समितीने शिवयात्रा आयोजित केली आहे.
पट्टा किल्ल्यावर अवतरतेय शिवसृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2016 23:25 IST