अहमदनगर : वाळूमाफिया विरोधात केलेल्या तक्रारीवरून अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांच्या चारचाकी गाडीला नगर-कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाटा येथे विनाक्रमांकाच्या डंपरने उडविण्याचा प्रयत्न केला. या अपघातात जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याने नि:शुल्क पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन रोडे यांनी पोलीस अधीक्षकांना गुरुवारी दिले.
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्यावतीने अरुण रोडे यांनी पारनेर तालुक्यातील अनेक वाळूमाफियांविरोधात तक्रारी केल्या आहेत. तसेच या भागातील अवैध वाळू उपसा बंद होण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. ते उपोषणाच्या तयारीत आहे. त्यांना वारंवार वाळू तस्करांकडून धमक्या मिळत आहेत. रोडे यांनी जीवितास धोका निर्माण झाला असल्याने पोलीस संरक्षण मिळण्याबाबत केलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुसरून जिल्हास्तरीय समितीने १९ ऑगस्ट २०२० पासून त्यांना सशुल्क पोलीस संरक्षण पुरवणेबाबत निर्णय घेतला आहे. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते पोलीस संरक्षण घेऊ शकले नाहीत. नि:शुल्क पोलीस संरक्षण मिळण्यासाठी काही दिवसांपूर्वीच त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय व नाशिकला विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन पाठविले होते. त्याची दखल घेतली नसल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे रोडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
--
फोटो-०१ अरुण रोडे कार
वाळू तस्कराकडून अरुण रोडे यांच्या कारवर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले.