लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला ब्रेक लावून सोमवारी (दि.७) जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी कोपरगावचे सहायक निबंधक एन. जी. ठोंबळ यांची बाजार समितीत प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासक ठोंबळ यांनी सोमवारी रात्री उशिरा पदभार स्वीकारला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१५ - २०२० या कार्यकाळात काळे गट, कोल्हे गट, परजणे गट, औताडे गट व वहाडणे गट यांच्या संचालक मंडळाच्या सहमती एक्स्प्रेसने कारभार हाकला. याच संचालक मंडळाची २९ ऑक्टोबर २०२० रोजी मुदत संपली होती. शासनाने कोरोनामुळे कोणत्याच निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुदत संपणाऱ्या सर्वच सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला पुढील निर्णय होईपर्यंत कामकाज सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कोपरगाव बाजार समितीच्या प्रशासनाने संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या २१ दिवस अगोदरच पणन महामंडळ संचालक, पुणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर यांच्या शिफारसी घेऊन ८ ऑक्टोबर २०२० रोजीच मंत्रालयात मुदतवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर मात्र संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यापेक्षा त्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी, असा निर्णय देण्यात आला. त्यानुसार मुदतवाढीचा प्रस्ताव दाखल केल्याच्या ५८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी ( दि.७ डिसेंबर ) बाजार समितीचा कारभार प्रशासकाच्या हाती देण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे बाजार समितीचा संपूर्ण कारभार हा प्रशासकाच्या हाती असणार आहे.