विनोद गोळे - पारनेरजगभरात जनलोकपाल व पाणलोट क्षेत्रातील कामामुळे पोहोचलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता आपल्या राळेगणसिध्दी गावात शेतीत रमले आहेत. शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतातून विषमुक्त भाजीपाला पिकवणे, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची शेती करणे, हा संदेश यातून दिला जाणार आहे. सितारा मिरची, शेवगा, दोडक्यासह अनेक भाजीपाला पिके संत यादवबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शेतात घेण्याचे सुरू केले आहे.राळेगणसिध्दीतून अण्णा हजारे यांनी संपूर्ण देशाला पाणलोटाचा मंत्र दिला. तर जनलोकपाल कायद्याच्या आंदोलनामुळे जगभरात अण्णांचा नावलौकीक झाला. सध्या तब्येतीमुळे अण्णांनी देशभरातील दौरे थांबवले आहेत. पण देशात व राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्याचे कामही त्यांच्याकडून सुरू आहे. गावातील संत यादवबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या जमिनीत अण्णा सुमारे अडीच एकरावर शेतीचे उत्पादन घेत आहेत. तसेच पॉलीहाऊस व शेडनेटची उभारणी सुरू असून तेथेही विविध उत्पादने घेतली जाणार आहेत. दोन कोटी लीटरचे शेततळे व शेवग्यात सिमला मिरचीचे आंतरपीकअण्णा हजारे यांनी संत निळोबाराय विद्यालयानजीक सुमारे दोन कोटी लीटर पाणी साठवण असलेले शेततळे उभारले आहे. शेततळ्यात पाणीसाठा करून त्याचे पाणी पिकांना दिले जाणार आहे. अडीच एकराच्या शेतीत शेवगा रोपाची लागवड केली असून त्यात सितारा मिरचीचे आंतरपीक घेतले आहे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्याला प्लास्टीक आच्छादन घातले आहे. तसेच ठिबक सिंंचनाने पाणी व सेंद्रीय औषधे दिली जात आहेत. त्यात गाईचे शेण, गावरान गाईचे गोमूत्र, काळा गुळ, दही व इतर पदार्थांपासून बनवलेले जीवामृत खते या मिरचीला दिली जातात. अण्णांच्या वाहनाचे चालक व स्वयंसेवक संदीप पठारे हे शेतीचे काम पाहत आहेत.अण्णा रोज दिवसातील अभ्यागतांच्या भेटीबरोबरच सकाळी तीन तास व सायंकाळी दोन तास शेतीकडे लक्ष देत आहेत. ठिबक व रोपांसह एकूण एक ते दोन लाख खर्च झाला असून चांगले उत्पादन होऊन चांगला भाव मिळाला तर दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकते, असा विश्वास संदीप पठारे यांनी व्यक्त केला.शेतीत चांगली पिके निघत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पण कमी खर्चात सेंद्रीय शेती करून त्याचे उत्पन्न, खर्च याचा ताळेबंद तयार करून ठेवला जाणार आहे. यातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेलच पण शासनाने शेतकऱ्यांना काय-काय उपलब्ध करून द्यावे, याचाही अभ्यास यातून होणार आहे. त्यामुळे हा पथदर्शी प्रकल्प होणार आहे.अण्णा हजारे,ज्येष्ठ समाजसेवक
अण्णा हजारे रमले शेतीत!
By admin | Updated: July 11, 2016 01:00 IST