लोकमत न्यूज नेटवर्क
कोेतूळ (जि. अहमदनगर) : अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड-कळसुबाई अभयारण्यात ‘निमॅस्पीस’ कुळातील ‘ड्राॅफ गेको’ नावाची अतिप्राचीन पाल सापडली. त्या पालीस हरिश्चंद्रगड ड्राॅफ गेको असे नावे देण्यात आले आहे.
अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड व कळसूबाई अभयारण्यात गेल्या दोन वर्षांपासून ‘ठाकरे वाइल्ड लाइफ फाउंडेशन व नॅशनल सेंटर फाॅर बायोलाॅजिकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून टाइनी क्रॅब (अतिलहान खेकडे) व निमॅस्पीस कुळातील पालींबाबत संशोधन करण्यात आले. संशोधनात या पाली अतिप्राचीन असल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत या कुळातील ५० पालींचा शोध लागला आहे. या पालींचे म्हैसूरचे पठार, अंदमान निकोबार येथेही अस्तित्व आहे.
इतर पाली उभ्या बुबुळाच्या निशाचर आहेत तर निमॅस्पीस किंवा ड्राॅफ गेको गोल बुबुळाच्या दिनचर आहेत. त्यांचे खाद्य सामान्य कीटक आहे. महाराष्ट्रात या निमॅस्पीस कुळातील पालीचे अस्तित्व हरिश्चंद्रगड परिसरात आढल्याने तिला ११ मे रोजीच्या सुटॅक्सा नावाच्या जागतिक संशोधन पत्रिकेत हरिश्चंद्रगड ड्राॅफ गेको असे नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे, इशान अग्रवाल, अक्षय खांडेकर यांनी हे संशोधन केले.
................
पश्चिम घाट जैवविविधतेने खच्चून भरलेला आहे. संशोधन झालेली पाल प्रादेशिक अतिप्राचीन अधिवासाचे प्रतीक आहे.
-डाॅ. व्ही. बी. गिरी, जागतिक दर्जाचे जैव संशोधक
...................
गत वर्षी तेजस ठाकरे यांनी खेकडे व पाली संदर्भात संशोधन करण्यास परवानगी मागितली होती. त्यांचे हे संशोधन हरिश्चंद्रगडाचे नाव जागतिक पातळीवर नेईल.
-डी. डी. पडवळे, वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी, हरिश्चंद्रगड अभयारण्य