अहमदनगर : महापौर सुरेखा कदम यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत, तर उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी वेदमंत्रांच्या घोषात पदभार स्वीकारला. महापौरांच्या पदभाराच्यावेळी उपस्थित असलेले मंत्री कदम यांनी ‘कलटी’ मारून उपमहापौरांच्या पदभार कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. पहिल्याच दिवशी युतीच्या नेत्यांच्या संवादात अंतरपाट दिसून आला. तरीही आमची युती कायम राहील, असा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला.नव्या महापौर-उपमहापौरांची २१ जूनला निवड होऊन त्यांचा कार्यकाळ एक जुलैपासून सुरू झाला. त्यानंतर सातव्या दिवशी गुरुवारी महापौर सुरेखा कदम आणि उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी पदभार स्वीकारला. पदभार घेण्यापूर्वी महापौर कदम यांनी महापालिकेच्या आवारात एक झाड लावले. त्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. मंत्री कदम यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून शहर विकासाचे मोठे काम तुमच्या हातून घडो, अशा शुभेच्छा दिल्या. ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या जयघोषात कदम यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, उपनेते अनिल राठोड, खासदार दिलीप गांधी, अॅड. अभय आगरकर, सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उपमहापौर श्रीपाद छिंदम, सहसंपर्क प्रमुख डॉ. विजय पाटील, सेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे यांच्यासह युतीचे आजी-माजी नगरसेवक हजर होते.कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांमध्ये मंत्री कदम यांनी महापालिकेतून काढता पाय घेतला. ते राठोड यांच्यासह निघून गेले. त्यानंतर उपमहापौर छिंदम यांनी त्यांच्या दालनात वेदमंत्रांच्या जयघोषात पदभार स्वीकारला. यावेळी खासदार दिलीप गांधी, प्रा. शशिकांत गाडे, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर हे शिवसेनेचे नेते हजर होते. छिंदम यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी महापालिकेच्या आवारात असलेले अॅड. अभय आगरकर, भाजपचे गटनेते दत्ता कावरे हे छिंदम यांच्या दालनाकडे फिरकले नाहीत. माजी आमदार राठोड हेही कदम यांच्यासमवेत निघून गेले. याची चर्चा महापालिका वर्तुळात चांगलीच रंगली होती. पदभार कार्यक्रमानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर-नागरिकांनी कदम-छिंदम यांना भेटून शुभेच्छा दिल्या.(प्रतिनिधी)‘त्या’फलकाची चर्चाबेकायदेशीर फलक लावणे हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर फलक लावला होता. त्याचीही चर्चा महापालिका वर्तुळात होती. फलक लावणाऱ्या कार्यकर्त्यांवर महापालिका प्रशासन कारवाई करणार का? याची प्रतीक्षा आहे.महापौर सुरेखा कदम व उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी गुरुवारी सायंकाळी महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी विविध योजनांच्या प्रगतीची माहिती घेतली. या बैठकीला विविध विभागाचे अधिकारी होते.
युतीच्या नेत्यांमध्ये पहिल्याच दिवशी अंतरपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 23:27 IST