श्रीगोंदा : सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी सर्व सभासदांचा मतदार यादीमध्ये समावेश करावा, या मागणीचे निवेदन कारखान्याचे उपाध्यक्ष केशवभाऊ मगर यांनी नगरचे प्रादेशिक सहसंचालक यांना दिले.
नागवडे साखर कारखान्याची निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे निवडणूक आयोगाकडून पुढे ढकलण्यात आली होती; परंतु सहकारी संस्था व ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याचे निवडणूक आयोगाने पुन्हा जाहीर केले आहे; पण नागवडे कारखान्याकडून मतदार प्रारूप यादी देत असताना ज्या सभासदांचा ऊस कारखान्यास गाळपास आला नाही किंवा जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेस ५ वर्षांपैकी एकाही सभेस हजर नाहीत. अशा सभासदांचा प्रारूप मतदार यादीत समावेश केलेला नाही; परंतु या वर्षीच्या गळीत हंगामात अनेक ऊस उत्पादक सभासदांचा गाळपासाठी उसाची नोंद आहे, तर काही सभासदांचा ऊस गाळपास आलेला आहे. अनेक सभासद दुष्काळामुळे ऊस घालू शकले नाहीत. त्यामुळे अशा सभासदांचा मतदार यादीत समावेश होणे आवश्यक आहे, असे मगर यांनी निवेदनात म्हटले आहे.