कर्जत : सध्या कर्जत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी टेस्ट, ट्रॅक व ट्रीट या त्रिसूत्रीवर आरोग्य, महसूल यंत्रणा काम करत आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या ठिकाणी जनजागृतीसाठी अधिकारी, कर्मचारी जात आहेत.
सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. गेल्या महिनाभरात तालुक्यात अनेक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या संकटानंतर मात करण्यासाठी प्रांत अधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळेे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी नियोजन करून उपाययोजना सुरू केल्या आहेत. कर्जत, मिरजगाव, कुळधरण, माळवाडी येथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.
येथे जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. भाजी विक्रेते, व्यापारी, फळविक्रेते यांच्या दारोदारी जाऊन अधिकारी व कर्मचारी जनजागृती करत आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी केली जात आहेत. याशिवाय राशीन, मिरजगाव, बारडगाव, कुळधरण, चापडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपीड व अँटिजन या दोन्ही तपासण्या केल्या जात आहेत. यामध्ये रुग्णांची तपासणी, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध, उपचार या त्रिसूत्रीवर आरोग्य व महसूल यंत्रणा काम करत आहे.
तालुक्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ११० बेडची व्यवस्था केली आहे. यामध्ये उपजिल्हा रुग्णालयात ४० बेडची, तर महात्मा गांधी विद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये ७० बेडची सोय केली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे दररोज रात्री ८ वाजता बाहेर पडून सर्व व्यवहार बंद ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन करत आहेत.
--
साडेसहा हजार जणांना कोरोना लस
कोरोनाची लस देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यातील ६ हजार ४३३ लोकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांत ३ हजार ५७७, कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात २ हजार ७५६, तर मिरजगाव येथील आत्माराम गिरी महाराज हाॅस्पिटलमध्ये १०० जणांना लस देण्यात आली आहे.
---
०१ कर्जत
कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे कोरोनासंदर्भात माहिती घेऊन उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन करताना अधिकारी.