गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) हा जंगलात आढळणारा वृक्ष आहे. कोकण कृषी विद्यापीठाने या झाडाला गिरिपुष्प असे सुंदर नाव दिले आहे. गिरिपुष्प हे द्विदल वर्गातील जलद वाढणारे झाड आहे. शिवाय ते अत्यंत काटक आहे. त्यामुळे ते केवळ पावसाच्या पाण्यावर होऊ शकते. या झाडाला १६ ते २० वर्षे आयुष्य आहे. गिरिपुष्पाच्या झाडाला एप्रिल-मे महिन्यांत शेंगा येतात. त्या वाळल्या म्हणजे त्यात चपट्या आकाराचे तपकिरी रंगाचे बी येते. या झाडाच्या पानांचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून केला जातो.
सध्याच्या हंगामात गिरीपुष्पाची पानगळ होऊन त्याच्या खोडाला जागोजागी फुलांचे ताटवे बहरतात. सरळसोट वाढणाऱ्या या वृक्षाला पोपटी रंगाची पाने असतात. हा वेगाने वाढणारा वृक्ष असल्याने वनविभागाकडून मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हा वृक्ष शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. याची पानं शेतामध्ये सेंद्रिय खत म्हणून उपयुक्त समजली जातात. गिरीपुष्प जमिनीत नायट्रोजनचा पुरवठा करतो. याच्या बियांचा आणि पानांचा उंदराच्या विषासाठी वापर केला जातो. कृषी विभागाकडूनही गिरीपुष्पाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रह केला जातो. पठारभागात वनविभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावरील लागवडीमुळे डोंगर गुलाबी रंगांच्या ताटव्यांनी निसर्गाच्या सौंदर्यात भर घालायचं काम करीत आहे.
............
तेलात बुडून गिरीपुष्प फुले गव्हाच्या पिकात किंवा घासामध्ये ठेवल्यास उंदीर येत नाहीत. या झाडाच्या पानांचा उपयोग सेंद्रिय खत म्हणून केला जातो. या वृक्षाखाली सर्पही येत नाहीत. शेतकऱ्यांनी या वृक्षाची लागवड करणे फायद्याचे आहे.
- रामदास थेटे, वन परिमंडळ अधिकारी, घारगाव, ता. संगमनेर
.............
फोटो - ०५संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या पठार भागात ठिकठिकाणी गिरिपुष्पाची वृक्ष बहरलेली दिसत आहेत.