याप्रकरणी सुरत येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अशोककुमार रामनिवास चौधरी यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. चौधरी यांची सुरत येथे ट्रान्सपोर्ट कंपनी असून ते अदानी कंपनीतून खाद्य तेलाची वाहतूक करतात. चौधरी यांनी सुरत येथील मोडासा ट्रान्सपोर्टमार्फत एका ट्रकमध्ये ३० लाख ६ हजार रुपयांचे खाद्य तेलाचे डबे भरून पुणे येथील कंपनीत पोहोच करण्याचे काम दिले होते. ट्रकचालक अरुण उदमले (पोखरीहवेली ता. संगमनेर) व अफजल साहेबखान पठाण (रा. मोमीनपूर, ता. संगमनेर) यांनी या तेलाची परस्पर विल्हेवाट लावून अपहार केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना यातील मुख्य आरोपी हा किशोर पडदुने असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. आरोपी मात्र वारंवार ठिकाणे बदल असल्याने त्याचा शोध लागत नव्हता. पडदुने हा नगरमधील एकविरा चौकात एका फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. सहायक निरिक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक इंगळे, हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, सखाराम मोटे, संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, सागर सुलाने, विजय धनेधर यांच्या पथकाने आरोपीस जेरबंद केले. पडदुने हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे ११ गुन्हे दाखल आहेत.
अदानी कंपनीचे ३० लाखांचे तेल चोरणारा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST