पीडित अल्पवयीन मुलगी ११ एप्रिल राेजी शाळेच्या बसची वाट पाहत असताना आरोपीने तेथे येऊन तिला त्याचा मोबाईल क्रमांक देण्याचा प्रयत्न केला. मुलीने नकार दिला तेव्हा त्याने तिला दमदाटी केली. त्यानंतर ३० एप्रिल रोजी आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन तू मला फोन का केला नाही, असे म्हणत तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच पुन्हा एकदा आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले. याबाबत पीडितेच्या आईने आरोपीस जाब विचारला तेव्हा त्याने शिवीगाळ करत दमदाटी केली. याबाबत पीडितेच्या आईने राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी निकम याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. याबाबत तत्कालीन उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले. खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने चार साक्षीदार तपासण्यात आले. समोर आलेले साक्षी-पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली. ॲड. केळगंद्रे यांना पोलीस कर्मचारी नंदा गोडे यांनी सहकार्य केले.
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST