भिंगार: एकीकडे पावसाने ओढ दिली आहे,धरणामधील पाणी साठे आटले आहेत. अत्यल्प पाणीसाठा असल्याने राज्य सरकारने पाणी कपातीचे धोरण स्वीकारले आहे. मात्र एम. आय. डी. सी. पाणी पुरवठा विभागाने कहर केला आहे. गेल्या आठ वर्षापासून जलवाहिनीची गळती रोखण्यास पाणी पुरवठा यंत्रणा अपयशी ठरली आहे. गळतीमुळे रस्त्यावर येणारे पाणी तुंबलेल्या गटारीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची पुरती वाट लागली आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कालबाह्य झालेल्या जलवाहिनीवर दुरुस्ती करीता एम.आय.डी.सी. पाणी पुरवठा विभागाने आजतागायत लाखो रुपये खर्च करूनही गळती थांबविण्यास पाणी पुरवठा यंत्रणा अपयशी ठरली आहे. गेल्या आठ वर्षापासून गटारात वाहून जाणाऱ्या या पाणी प्रश्नावर अनेक आंदोलने,निवेदने झाली आहेत, परंतु पाणी प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. गटारात जाणाऱ्या पाण्यावर दहा ते बारा गावाची तहान भागू शकते. इतक्या मोठया प्रमाणावर पाणी गटारात वाहून जात आहे. शहराच्या मध्य वस्तीतून राष्ट्रीय महामार्ग जातो. याच रस्त्याखाली कालबाह्य झालेली जलवाहिनी असून अनेकदा अवजड वाहतुकीमुळे दाब पडून जलवाहिनीला गळती लागते. बाह्यमार्गाने जलवाहिनी टाकणे शक्य असताना आहे त्याच वाहिनीवर दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी सुरु आहे. याच खर्चात नवीन जलवाहिनी शहराच्या बाहेरून टाकणे शक्य होते. या गळतीमुळे महामार्ग दुरवस्था झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रहदारीचा खोळंबा हे रोजचे चित्र आहे. एम.आय.डी.सी. पाणी पुरवठा विभाग व राष्ट्रीय महामार्गाच्या गलथान कारभाराने नागरिकांना वेठीस धरले आहे. पर्यायी उपलब्ध रस्ते लष्कराच्या हद्दीतून जातात. पण सुरक्षितेच्या कारणास्तव तेही बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. गळती व खराब रस्त्याने नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक वाहने रस्त्याच्या खडड्यात फसल्याने वारंवार वाहतूक व्यवस्था कोलमडत आहे. (वार्ताहर)शहरातील तुंबलेल्या गटारीचे मैला मिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत आहे. महामार्गालगत वेशी जवळ आणि वर्दळीच्या ठिकाणी वाळलेला वृक्ष धोकादायक स्थितीत आहे. याच रस्त्यावर शुक्रवारी बाजार भरतो. ग्राहक वर्ग रस्त्यावर वाहने लावून खरेदीसाठी जात असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याची झाली. विकासाची गंगा केव्हाच आडली आहे. वाहत आहे ती गटार गंगा. भिंगारकर अच्छे दिन च्या प्रतीक्षेत आहेत.
पाणीगळतीमुळे अपघात
By admin | Updated: July 28, 2014 00:51 IST