पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव, बेलपिंपळगाव परिसरात गेल्या आठवड्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या आर्द्राच्या दमदार पावसाने खरिपातील खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे.
सोयाबीन, बाजरी, ताग आदी पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे.
गत महिन्यात १५ ते २०दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जूनच्या शेवटच्या टप्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे पावसाची आस लावून बसलेला शेतकरी जमिनीत पुरेसा वापसा येताच खरिपाच्या पेरण्या उरकण्याच्या तयारीला लागला असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांनी वेळेआधीच बी-बियाणे, खते आदीची खरेदी करून ठेवल्याने खरीप पिकाच्या पेरण्यांना सुरुवात झाली असून आधुनिक पद्धतीच्या बीबीएफ यंत्राच्या साह्याने ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. काही पेरण्या बैलांच्या साहाय्याने सुरू आहेत.
आतापर्यंत पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली असून पाचेगावात जून अखेर एकूण २१४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
---
३० पाचेगाव
पाचेगाव परिसरात सुरू असलेली पेरणी.