संगमनेर : स्वर्गीय विलासराव देशमुख व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील नातं जपण्यासाठी मी आलोय. सर्वसामान्यांच्या कल्याणाचं काम इथं चाललयं. अधून-मधून नंबर वनच्या बातम्या येतात, तेही होईल. भविष्यात राज्याला दिशा देण्याची क्षमता या नेत्यात आहे, असे गौरवोद्गार राज्य उत्पादन शुल्क, पर्यटन राज्यमंत्री अमित देशमुख यांनी काढले. दंडकारण्य अभियानांतर्गत शनिवारी निमज येथे आयोजित आनंद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी थोरात होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, राहुल दिवे, दयानंद चोरगे आदी होते. देशमुख म्हणाले, थोरातांसारखी माणसं लाभणं नगर जिल्हा व संगमनेर तालुक्याचं सौभाग्य असून त्याला आपण जपलं पाहिजे. स्वर्गीय भाऊसाहेब थोरातांचा विचार जोपासण्याचं काम सारी मंडळी करीत आहेत. थोरातांच्या रूपाने उमदा पालक लाभला, हे लातूर कधीच विसरणार नाही. सामान्य माणसाला जलदगतीनं न्याय देण्याची विलासराव देशमुख यांची किमया अंगीकारली पाहिजे, असेही ते म्हणाले. दंडकारण्य उपक्रम ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड’मध्ये नोंदविण्यास पात्र असल्याचे देशमुख म्हणाले.थोरात म्हणाले, विलासराव विश्वासू सहकारी म्हणून माझ्याकडं पहायचे. आमच्यात जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांच्या जाण्यानं मोठं दु:ख राज्याला झालं. दंडकारण्याचं चांगलं काम झालं. पण पाऊस नसल्याने कठीण परिस्थिती आहे. निळवंडे धरणाच्या कालव्यांची ७५ टक्के कामे तालुक्यात झाली आहेत. एवढं सगळं कष्टानं उभं केलेलं असूनसुध्दा बेडकं ओरडायला लागली. पाट पाण्यावाल्यांपेक्षा हे कष्टाचं आहे. आमच्या हक्काचं मोडीत काढण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, असा खणखणीत इशारा थोरात यांनी दिला. तांबे यांनी काँग्रेस पक्ष अडचणीत असून चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र आपल्याकडे अपेक्षेने पाहत आहे. पक्षाचे पुनर्जीवन आपण कराल, अशी इच्छा देशमुख यांच्याकडे व्यक्त केली. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांचे मनोगत झाले. निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले. स्वागत संपत डोंगरे यांनी, तर प्रास्ताविक अॅड. माधव कानवडे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी करून उपसरपंच विलास कासार यांनी आभार मानले. याप्रसंगी वन विभागाचे उपमहासंचालक अरविंद विसपुते, मुख्य वन संरक्षक अरविंद पाटील, उपविभागीय वन अधिकारी शिवाजी फटांगरे, अनिल देशमुख, अजय फटांगरे, अर्चना बालोडे, बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.
राज्याला दिशा देण्याची क्षमता थोरातांमध्ये
By admin | Updated: July 20, 2014 00:23 IST