अहमदनगर : नगर-औरंगाबाद रोडवर धनगरवाडी शिवारात एका कारमधून नेण्यात येत असलेला ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा ९० किलो गांजा पकडण्यात एम.आय.डी.सी. पोलिसांना यश आले आहे. शनिवारी रात्री नऊ वाजता पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. कारमध्ये बसलेले दोघेजण कार सोडून पळून गेले, मात्र रविवारी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी २ लाख रुपये किमतीची कारही ताब्यात घेतली आहे.पोलिसांनी नगर-औरंगाबाद रस्त्यावर एम.आय.डी.सी. पोलिसांची गस्त सुरू होती. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक बकाले आणि त्यांचे सहकारी सरकारी जीपने इमामपूरकडे निघाले होते. यावेळी त्यांच्यासमोरून जात असलेली एक पांढऱ्या रंगाची कार त्यांना साईड देत नव्हती. बराचवेळ ही कार साईड देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना संशय आला. याचवेळी या कारने अचानकपणे धनगरवाडीकडे वळसा घेतला आणि कार रस्त्यावर सोडून डोंगराच्या दिशेने पळाले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये हिरवा गांजा आढळून आला. या कारमध्ये गांजाचे प्रत्येकी दोन-दोन किलो वजनाचे प्लास्टिक व कागदाने गुंडाळलेले ४५ पुडके व खोके होते. पोलिसांनी उघडून पाहिले असता त्यामध्ये गांजा आढळून आला. तिथेच गांजाची मोजणी केली असता तो ९० किलो होता. याची बाजारातील किंमत ३ लाख ६० हजार एवढी आहे. पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीची कार (एम.एच.-१८, एस.-५८८) ताब्यात घेतली आहे. दोन्हीही आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल वाय. एल. शेख यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलीस हेड कॉन्स्टेबल हट्टेकर तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)दरम्यान रविवारी रात्रीपासून पोलीस त्या कारमधील अज्ञातांच्या शोधात होते. रविवारी दोघा जणांना अटक केली आहे. मदन मोनीसिंग परदेशी (वय ४२, रा. सलाबतपूर, ता. नगर) आणि जावेद युनूस पठाण (वय २३, रा. खडका फाटा. ता. नेवासा) यांना अटक केली आहे.
साडेतीन लाखांचा ९० किलो गांजा जप्त
By admin | Updated: July 7, 2014 00:36 IST