राहुरी : जून-जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ७५० हेक्टर क्षेत्रावरील बिजोत्पादन कार्यक्रम कोलमडला आहे़ नगर जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी मुळा धरणाचे पाणी न मिळाल्याने ४०५ हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याचे नियोजन ठप्प झाले आहे़ विद्यापीठाच्या बिजोत्पादन कार्यक्रमात केवळ ८ टक्के पेरण्या झाल्या आहेत़ राहुरीबरोबरच जळगाव व सोलापूर येथेही बिजोत्पादन कार्यक्रमाला फटका बसला आहे़ बिजोत्पादन कार्यक्रमात मूग ८ हेक्टर, उडिद १५ हेक्टर, तर तूर १२़५ हेक्टरवरील वाया गेले आहे़ ८५० हेक्टरपैकी केवळ २० हेक्टर क्षेत्रावर बिजोत्पादन झाले आहे़ महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मे मध्ये जमिनीच्या मशागती केल्या होत्या़ ४० एकर क्षेत्रावर कांदा रोपवाटिकेचे नियोजन करण्यात आले होते़ मात्र पाऊस न पडल्याने व पाणी उपलब्ध न झाल्याने रोपवाटिकेचे नियोजन कोलमडले आहे़ २३ हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाचे नियोजन होते़ मात्र पावसाअभावी भुईमुगाची संधी गेली आहे़ जळगाव येथे ११ हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे, तरसोलापूर येथे ५ हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाचे नियोजन होते़ मात्र पावसाने अंगठा दाखविल्याने अडचण निर्माण झाली आहे. मक्याचे नियोजन २२ हेक्टरवर, तर बाजरीचे २ हेक्टरवर होते़ बाजरीचा हंगाम संपला आहे़ सोलापूरला कुलथीचे उत्पादन करता आले नाही़ विद्यापीठाचा बिजोत्पादन कार्यक्रम धोक्यात आल्याने राज्यातील शेतकऱ्यांपुढे बियाणांचा प्रश्न निर्माण झाला आहे़ (तालुका प्रतिनिधी) चाऱ्याचे नियोजन विस्कळीत जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांच्या बैठकीत कृषी विद्यापीठात जिल्ह्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ४०५ हेक्टर क्षेत्रावर चारा घेण्याचे नियोजन केले होते़ त्यासाठी मुळा धरणातून चाऱ्यासाठी चार पाणी देण्यास हिरवा कंदील दाखविला होता़ त्यामुळे विद्यापीठाने चाऱ्याचे नियोजन केले़ मात्र पाणी मिळत नसल्याने चारा पीक घेण्यास अडसर निर्माण झाला आहे़ साखळी तीन वर्ष विस्कळीत यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे पुढील वर्षी शेतकऱ्यांना बियाणे मिळणार नाही़ ३१ जुलैपर्यंत पाऊस झाला तर ५० टक्के बियाणे उपलब्ध होऊ शकेल़ मात्र बाजरी, उडीद व मूग ही पिके घेता येणार नाहीत़ त्यामुळे आता पुढील तीन वर्षे साखळी विस्कळीत होईल़ - डॉ.मधुकर धोंडे, प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे विभाग.
७५० हेक्टर बिजोत्पादन कोलमडले
By admin | Updated: July 15, 2014 00:47 IST