अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला नसला तरी परिस्थिती गंभीर आहे. यावर प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असली तरी पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न बिकट आहे. या परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी आदर्श ठरेल असे काम करावे, याची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी केली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळतांना आपले योगदान व्हावे, यासाठी २००७ पासून त्यांना मिळालेले मानधन, विविध बैठकांचे भत्ते तांबे यांनी व्याजासह अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्याकडे धनादेशाव्दारे परत केले आहे. जिल्ह्यात यंदाही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. साडेतीनशे टँकरव्दारे सहा लाख जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पावसाळा लांबल्यास सर्व सामान्य, शेतकरी यांना मोठ्या संकटाला समोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी सर्व सामान्यांना दिलासा मिळेल, अशा प्रकारे काम करणे आवश्यक आहे. यामुळे तांबे यांनी त्यांना २००७ पासून जिल्हा परिषद सदस्य या पदासाठी मिळालेले भत्ते, विविध सभांचे मानधन अशी ७८ हजार रुपयांची रक्कम व्याजासह जिल्हा परिषद अध्यक्ष लंघे यांच्याकडे सुपूर्द केली आहे. तांबे यांनी लंघे यांना एक लाख एक रुपयांचा धनादेश दिला आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, अर्थ व बांधकाम सभापती कै लास वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके, बाळासाहेब हराळ, परमवीर पांडुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, धनंजय जाधव, अभिजित लुणिया उपस्थित होते.जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. माझ्या एक लाख रुपयांच्या मदतीने परिस्थितीत मोठा बदल होणार नाही, अथवा मदत होणार नाही. मात्र, चांगल्या कामाला कोणीतरी सुरूवात करणे आवश्यक होते. यामुळे मिळालेला भत्ता आणि मानधन पुन्हा जिल्हा परिषदेला व्याजासह परत करत आहे.सत्यजित तांबे, जिल्हा परिषद सदस्य.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ७ वर्षांचे मानधन!
By admin | Updated: July 16, 2014 00:41 IST