लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींपैकी २९ ग्रामपंचायतींसाठी एकूण ९७५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ११ अर्ज हे अवैध तर ९६४ अर्ज वैध ठरविण्यात आले होते. सोमवारी (दि.४ जानेवारी) एकूण ३५३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले आहेत. एकूण २७९ जागेपैकी परजणे गटाच्या ताब्यातील सांगावी भुसार या ग्रामपंचायतीच्या ९ जागांपैकी ६ व जेऊर कुंभारी येथील १ अशा एकूण ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे २७२ जागांसाठी ६११ उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्याने प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
कोपरगाव तालुक्यातील राजकारणात आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे या मातब्बर नेतेमंडळींचे पक्षीय राजकारणा पेक्षाही गटातटाचे राजकारण प्रचलित आहे. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील राजकारणाची गणिते ही याच नेत्याभोवतीच फिरत असतात. त्यातच तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींवर काळे गट व कोल्हे गट यांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. त्यामुळे त्याच्या माध्यमातून बहुतांश ग्रामपंचायतींवर याच नेतेमंडळींचे झेंडे आहेत. तसेच यातीलही काही ग्रामपंचायतींवर परजणे गट, औताडे गट यांच्यासह इतरही संमिश्र सत्ता आहे.
सध्या होऊ घातलेल्या २९ ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ग्रामपंचायतीवर काळे व कोल्हे गटाचे वर्चस्व आहे. विशेष म्हणजे राजेश परजणे यांचे गाव असलेल्या संवत्सर ग्रामपंचायतीमध्ये परजणे गट, काळे गट व कोल्हे गट यांच्यात सरळ तिरंगी लढत होत आहे. तर तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे गाव असलेल्या येसगाव ग्रामपंचायतीसह उर्वरित २६ ग्रामपंचायतींसाठी काळे, कोल्हे यांच्यातच सरळ-सरळ दुरंगी लढत होत आहे; परंतु, काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी देखील आपली मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे अपक्षांमुळे चांगलीच डोकेदुखी वाढू शकते. एकंदरीतच कोरोनामुळे निवडणुका बिनविरोध होतील अशी अपेक्षा होती; मात्र तसे न झाल्याने ऐन हिवाळ्यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापणार आहे.
.........
तालुक्यात एकूण ग्रा. पं. - ७५
उमेदवार संख्या - ६११
एकूण बिनविरोध ग्रामपंचायती - ००
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती - २९
असल्यास तिरंगी लढती किती ठिकाणी-०१
एकूण प्रभाग - १०२
एकूण सदस्य - २७९
पुरुष मतदार - ३२,८९६
महिला मतदार - ३०,८८९
एकूण मतदार - ६३,७८५