चंद्रकांत शेळके/ज्ञानेश दुधाडे, अहमदनगरबीएनपी रिअल इस्टेट अॅण्ड अलाईड या इंदोरस्थित कंपनीतील गुंतवणूक घोटाळा समोर आल्याने नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील सुमारे २० हजार गुंतवणूकदारांचे तब्बल ६० कोटी रूपये या कंपनीत अडकले आहेत. कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने गुंतवणूकदार आता स्थानिक एजंटांच्याच मानगुटीवर बसले आहेत. १५ दिवसांपूर्वी नगरमधील या कंपनीचे कार्यालयही बंद झाले. ग्रामीण भागातील गरीब, सर्वसामान्य लोकांचे लाखो रूपये यात अडकल्याने पोलिसांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.सन २०१० मध्ये अहमदनगर शहर व जिल्ह्यात बीएनपीने आपले बस्तान बसवले. कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी व संचालकांनी नगर जिल्ह्यातील स्थानिक लोकांना भरघोस कमिशनचे आमिष दाखवून एजंट बनवले. १०० पासून ५००० रूपयांपर्यंत आरडी किंवा एफडीच्या स्वरूपात पैसे गुंतवणूक करण्यास हे एजंट जोमाने कामाला लागले. साखळी पद्धतीचा हा सर्व व्यवहार होता. सुरूवातीच्या एजंटांनी याच कमिशनवर दुचाकी, चारचाकी गाड्या घेतल्या. त्यामुळे एजंटांची साखळीच तयार झाली. पाहता पाहता जिल्ह्याभरातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी आपले कष्टाचे पैसे एजंटांच्या भरवशावर पणाला लावले. सुरूवातीला यात काहींना परतफेड मिळाली. परंतु गेल्या दीड वर्षांपासून कंपनी पैसे देण्यास चालढकल करत होती. आपल्या सर्वांचे पैसे मिळतील, सर्वजण एजंटांच्या संपर्कात राहा, असे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात येत होते. तेव्हापासूनच गुंतवणूकदार धास्तावले होते, परंतु एजंटांच्या भरवशावर त्यांनी धीर धरला. या सर्व प्रकारामुळे एजंटांनाही चांगलाच घाम फुटला आहे. कारण गुंतवणुकीची रक्कम आवाक्याबाहेरची आहे. लोकांनी कंपनीकडे पाहून नव्हे, तर ओळखीच्या एजंटांना पाहून व्यवहार केल्याने ते आता एजंटांच्या मानगुटीवर बसले आहेत.या प्रकाराने धास्तावलेल्या काही एजंटांनी दीड महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून यात लक्ष घालण्याची मागणी केली. संतापलेल्या गुंतवणूकदारांनी आता एजंटांकडे पैशासाठी तगादा लावला असल्याने एजंट प्रचंड तणावाखाली आहेत. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी एजंट व सामान्य गुंतवणूकदारांकडून होत आहे.कार्यालय बंद झाल्याने खळबळनगर-पुणे महामार्गावर ओम पेट्रोलपंपाजवळ कंपनीचे कार्यालय होते. सुरूवातीच्या काळात पैसे भरण्यासाठी या कार्यालयात झुंबड उडायची. परंतु जसजसा कंपनीकडून पैसे (मॅच्युरिटी) देण्यास विलंब होत गेला, तशी नवीन गुंतवणूक बंद झाली. आपले पैसे बुडतील की काय, अशी चर्चाही तेव्हाच दबक्या आवाजात सुरू झाली होती. परंतु सर्वांची बोटे दगडाखाली असल्याने कोणी समोर येत नव्हते. शिवाय कार्यालय सुरू असल्याने पैसे मिळण्याची आशा होती. परंतु १५ दिवसांपूर्वी कार्यालय बंद झाल्याने एकच खळबळ उडाली. कंपनीचा एकही प्रतिनिधी नगरमध्ये नसल्याने त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.आमिष दाखवणारे निर्धास्तज्यांनी हा साखळी व्यवसाय नगरमध्ये आणला. सामान्य लोकांना यात गुंतवणूक करायला भाग पाडले. त्यांच्या कमिशनवर चारचाक्या घेतल्या. लाखोंची संपत्ती कमवली असे येथील वरिष्ठ एजंट आता हात वर करत आहेत. एवढा खळबळजनक प्रकार होऊनही त्यांनी अद्याप पोलिसांत फिर्याद दिलेली नाही. गुंतवणूकदारांना ते टोलवत आहेत. परंतु शेवटी त्यांच्याही गळ्याला हा फास बसणार आहे, असा संताप काही गुंतवणूकदारांनी व्यक्त केला.गुंतवणूकदाराने नेले फर्निचर वारंवार चकरा मारूनही पैसे मिळत नसल्याने एका गुंतवणूकदाराने हे कार्यालय उघडून चक्क येथील फर्निचर, संगणक व पंखे आदी सर्व साहित्य टेम्पोत टाकून नेले. त्याची जवळपास अडीच लाखाची गुंतवणूक असल्याचे समजते. संबंधित कार्यालय कंपनीच्या मालकीचे असल्याचे समजते. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला, तर या कार्यालयाच्या लिलावातून काही लाख रूपयांची रक्कम उभी राहू शकते. त्यातून काही पैसे अदा होतील, अशी माहिती एका गुंतवणूकदाराने दिली.
‘बीएनपी’त अडकले ६० कोटी!
By admin | Updated: July 29, 2016 17:49 IST