अहमदनगर : तालुक्यातील नगर-सोलापूर रोडवरील वाळुंज शिवारात नगर तालुका पोलिसांनी अवैध विक्रीसाठी जात असलेला ५५ पोते गुटखा जप्त केला. या गुटख्याची किंमत २५ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.सोलापूर रोडवरून बुधवारी सायंकाळी एका वाहनातून गुटखा विक्रीसाठी जात असल्याचे नगर तालुका पोलिसांच्या निदर्शनास आले. हा गुटखा हैदराबाद येथून मुंबई येथे विक्रीसाठी नेण्यात येत होता. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस कर्मचारी बापूसाहेब थोलाने, आयुब शेख यांच्या पथकाने गुटखा घेऊन वाहन (क्रमांक एपी-२९, टी-८७९१) पकडले. या वाहनामध्ये गुटख्याचे ५५ पोते आढळून आले. या गुटख्याची किंमत २५ लाख रुपये असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जप्त केलेला गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे. गुटख्याची किंमत निश्चित केल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
५५ पोते गुटखा जप्त
By admin | Updated: February 24, 2016 23:43 IST