अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राबविलेल्या अतिसार नियंत्रण सप्ताहात जिल्ह्यात २ हजार १७९ बालके डायरीयाचे शिकार झाल्याचे आढळून आले आहे. यात १९५ बालकांना जलशुष्कतेची बाधा झाली असून या सर्व बालकांवर उपचार सुरू आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५० हजार ओआरएस पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. देशात अतिसार या आजारामुळे दरवर्षी ११ टक्के बालकांचा मृत्यू होतो. यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात अतिसार नियंंत्रण पंधरवाडा कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने प्रत्येक जिल्हा परिषदेला अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यास सांगितले. जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत येणाऱ्या गावात तीन हजार आशा स्वयंसेविकांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी जिल्हाभर गृहभेटी देत पाच वर्षाखालील बालकांची तपासणी केली. यात २ लाख ६ हजार ९७ बालकांपैकी २ हजार १७९ बालके अतिसारग्रस्त आढळून आली. या बालकांवर घरगुती जलसंजीवनी, ओआरएस पावडर आणि झिंक गोळ्याव्दारे उपचार केले. १९५ बालके जलशुष्कतेची बाधा झालेली असल्याचे आढळून आले. जिल्ह्यात सुदैवाने अतिसारामुळे एकही बळी गेला नसला तरी डायरीयाग्रस्तांची संख्या मोठी असल्याने आरोग्य विभागाने काळजी व्यक्त केली आहे. यासाठी ५० हजार ओआरएस पाकिटांचे आणि ५० हजार ३२३ झिंक गोळ्यांचे वाटप केले. (प्रतिनिधी)या कार्यक्रमाला ३१ तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. डायरीयाग्रस्तांवर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांना सलग १४ दिवस ओआरएस सोबत झिंक औषध देण्यात येत आहे. प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे हा आजार होतो. पिण्याचे पाणी शुध्द आहे की नाही, याची खात्री आवश्यक आहे.- पी. बी. गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी.
२२०० बालके डायरीयाने बाधित
By admin | Updated: August 17, 2014 23:45 IST