कुपोषण, रक्ताक्षय आणि जंतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जंतनाशक मोहीम राबविण्यात येते. १ ते १८ वर्षे वयोगटापर्यंत मुला-मुलींना दरवर्षी शाळेत जंतनाशक गोळीचे वाटप केले जाते. गतवर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा बंदच आहेत. जे वर्ग बंद आहेत त्या वर्गातील मुलांना अंगणवाडी सेविका, आशा यांच्यामार्फत घरपोच गोळ्या दिल्या जात आहेत. तर शाळा सुरू असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. जिल्ह्यात सध्या आठवी ते बारावी अशा एकूण २०२ शाळा सुरू असून, त्यात सुमारे १६ हजार उपस्थिती आहे.
जिल्ह्यात २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या आठवडाभरात सुमारे १२ लाख ७३ हजार लाभार्थ्यांना या गोळ्यांचे वाटप होणार आहे.
--------------
काय आहे जंतदोष?
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. २८ टक्के बालकांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून असा कृमी दोष होण्याची शक्यता आहे, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे.
---------------
आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप
वयाच्या १८ वर्षापर्यंत आरोग्य विभागातर्फे मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येते. वर्षातून दोन वेळा ही मोहीम राबविण्यात येते. चालू वर्षात मार्चमध्ये गोळ्या वाटप झाल्या. आता पुढील आठवड्यात ही मोहीम सुरू होत आहे.
-------------
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?
पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा बंद असल्याने आशा, अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच गोळ्यांचे वाटप होणार आहे. आठवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत गोळ्यांचे वाटप होईल.
---------
वर्षभरातून दोनदा जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबवली जाते. २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान यंदाची दुसरी मोहीम राबवण्यात येईल. यात १२ लाख ७३ हजार लाभार्थ्यांना या गोळ्या देण्यात येणार आहेत.
- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.